इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष आता दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. दोघांमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये एक भयावह दृश्य पाहायला मिळालं. इस्रायलने नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात लेबनानचा एक पत्रकार जखमी झाला आहे. इस्रायलच्या क्षेपणास्त्राने लेबनॉनचे पत्रकार आणि मिराया इंटरनॅशनल नेटवर्कचे मुख्य संपादक फादी बुदाया हे जखमी झाले आहेत. या घटनेदरम्यान ते लाइव्ह टीव्ही मुलाखत घेत होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये बुदाया अचानक जोरदार धडाक्याने आपले संतुलन गमावताना आणि संभाषणादरम्यान कॅमेऱ्यासमोर खाली कोसळताना दिसत आहेत. या हल्ल्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या हल्ल्यानंतर बुदाया यांनी सोशल मीडियावर आपल्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की, "ज्यांनी माझ्याबद्दल चौकशीसाठी फोन केले, मेसेज केले आणि काळजी केली त्या सर्वांचे आभार. अल्लाहच्या कृपेने मी ठीक आहे आणि आम्ही आमचे मीडिया कर्तव्य पार पाडत आहोत. लेबनॉनचे पत्रकार बुदाया हे हिजबुल्लाहचे समर्थक मानले जातात.
इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना हा हल्ला करण्यात आला आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये गाझा युद्ध सुरू झाल्यापासून दोन्ही बाजूंनी सीमेपलीकडील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या सायबर हल्ल्यांनंतर दोघांमधील परिस्थिती आणखी बिघडली आहे. यापूर्वी हिजबुल्ला कमांडर्सच्या पेजर आणि वॉकी टॉकीजमध्ये स्फोट झाल्यानंतर तणाव वाढला आहे. हिजबुल्लाह यासाठी इस्रायलला जबाबदार धरत असून आपले हल्ले वाढवत आहे.
त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने सोमवारी लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ५० हून अधिक मुलांसह ५५० हून अधिक जण ठार झाले. त्याच दिवशी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून लेबनॉनच्या नागरिकांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले होते. ऑपरेशन संपल्यानंतर ते आपापल्या घरी परत येऊ शकतात असे त्यांनी सांगितले.
मंगळवारी इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र विभागाचे प्रमुख इब्राहिम कुबैसी ठार झाले. इस्रायलच्या संरक्षण दलाने त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला असून कुबैसी हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र मोहिमेचे प्रमुख होते. कुबैसी यांच्यासह अन्य दोन वरिष्ठ कमांडरही ठार झाल्याचे वृत्त आहे. दहिये उपनगरात झालेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलच्या शहरांवर ३०० हून अधिक रॉकेट डागले.