Viral News: लांबच्या रेल्वे प्रवासादरम्यान खाणे- पिणे सामान्य आहे. काही प्रवासी घरूनच सर्व व्यवस्था करतात, तर काही रेल्वेत फिरणाऱ्या विक्रेत्यांवर अवलंबून असतात. मात्र, काही विक्रेते अशा प्रवाशांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. सध्या सोशल मीडियावर रेल्वेत चहा विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चहाविक्रेता चक्क शौचालयात चहाचा डबा धुताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका शौचालयात चहाचा डबा धुताना दिसत आहे. हे शौचालय रेल्वेतून असल्याचे बोलले जात आहे आणि चहाविक्रेता शौचालयाच्या जेट स्प्रेने कंटेनर साफ करत आहे. yt_ayubvlogger23 नावाच्या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘ट्रेन की चाय’ असे लिहिण्यात आले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ही घटना कोणत्या रेल्वे किंवा रेल्वे स्थानकात घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच हा व्हिडिओ कधीचा आहे? हे ही स्पष्ट झालेले नाही. हिंदुस्तान टाईम्स मराठीने व्हायरल व्हिडिओला दुजोरा दिलेला नाही.
हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडिया युजर्सचा संताप उफाळून आला आहे. एका युजरने लिहिले की, ‘हे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत तयार केलेला चहा कोणी कसा पिऊ शकतो? असा चहा प्यायल्याने प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.' दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'रेल्वेतून प्रवास करताना बाहेरील खाद्य पदार्थ खरेदी करण्याचे टाळा. हा फक्त चवीचा प्रश्न नाही तर, स्वच्छता आणि आरोग्याचाही प्रश्न आहे.’ अनेक युजर्स अधिकाऱ्यांकडे कारवाई करण्याची आणि ट्रेनमधील स्वच्छतेच्या मानकांची काटेकोर पणे अंमलबजावणी करण्याची विनंती करत आहेत.
संबंधित बातम्या