Viral News: बंगळुरूत एका तरुणाला मारहाण तसेच नग्नावस्थेत रस्त्यावर फिरायला लावल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरोपीने जुन्या वादातून पीडित तरुणासोबत असे संतापजनक कृत्य केले. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर चिंता निर्माण झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन गौडा ऊर्फ कडुबू असे संशयिताचे नाव आहे. गौडा आणि पीडित तरुण मित्र असून गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणांवरून वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी आरोपीने पीडित तरुणाला भेटायला बोलवले. हा तरुण तिथे गेला असता आरोपीने त्याला बेदम मारहाण केली. नंतर त्याला अंगावरचे सर्व कपडे काढण्यास भाग पाडले आणि रस्त्यावरून पळायला लावले.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपी हा पीडित तरुणाला शिवीगाळ करताना दिसत आहे. 'पुन्हा तू या भागात दिसायचे नाही. दिसला तर संपला. आता अंगावरचे सर्व कपडे काढ आणि येथून जा', असे आरोपी पीडित तरुणाला बोलताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस कारवाईत उतरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने आपल्या विरोधकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी असे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. आरोपी आणि पीडित तरुण दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.
छत्तीसगडमधील आदिवासीबहुल सुकमा जिल्ह्यातील एका गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका महिलेसह दोन जोडप्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी एकाच गावातील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. ही घटना कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकताल गावात घडली.
मौसम कन्ना आणि त्याची पत्नी मौसम बिरी, मौसम बुचा आणि त्याची पत्नी मौसम आरजू अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्यासोबत लच्छी नावाची आणखी एक स्त्री होती. हत्येची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. सावलम राजेश, सावलम हिडमा, करम सत्यम, कुंजाम मुकेश आणि पोडियाम एन्का अशी आरोपींची नावे आहेत.