Air India Flight News: दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात पत्रकार महिलेला देण्यात आलेल्या ऑम्लेटमध्ये झुरळ आढळल्याची घटना उघडकीस आली. ही घटना १७ सप्टेंबर रोजी एअर इंडियाच्या एआय १०१ फ्लाइटमध्ये घडली. या घटनेने एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांनी चिंता व्यक्त केली आहे.
पत्रकार सुईशा सावंत यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील धक्कादायक अनुभव शेअर केला. ‘दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात मला देण्यात आलेल्या ऑमलेटमध्ये झुरळ सापडले. मी आणि माझ्या मुलाने अर्ध्यापेक्षा जास्त ऑम्लेट खाल्ल्यानंतर आम्हाला त्यात झुरळ दिसले. यामुळे आम्हाला विषबाधा झाली.’
सावंत यांनी एअर इंडिया, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांना टॅग करत उड्डाणादरम्यान देण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे.
सुयशा सावंत यांनी शेअर केलेल्या पोस्टवर एअर इंडियाने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘प्रिय सावंत, तुमचा अनुभव ऐकून आम्हाला खूप वाईट वाटले. कृपया डीएमद्वारे आपले बुकिंग तपशील सामायिक करा जेणेकरून आम्ही त्वरित तपास करू शकू. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल', असे एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
एअर इंडियाने जगभरातील आघाडीच्या विमान कंपन्यांना जेवण पुरवणाऱ्या नामांकित केटरर्ससोबत भागीदारी वर भर दिला, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची सुरक्षितता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कठोर मानक ऑपरेटिंग प्रक्रिया आणि अनेक गुणवत्ता तपासणीचे पालन केले. एअर इंडियाच्या फ्लाइटमधून प्रवास करताना प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळल्याची ही पहिली घटना नसून याआधी अशाप्रकारचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले. त्यावेळीही विमान कंपनीनी दोषींविरोधात कठोर पावले उचलली जातील, असा इशारा दिला होता.
दरम्यान, १० सप्टेंबर रोजी सीएपटेल इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिप पटेल यांनी एअर इंडियाच्या १५ तासांच्या उड्डाणातील बिझनेस क्लाससेवेवर टीका केली. बिझनेस क्लासमधून प्रवास करण्यासाठी त्यांनी ६ हजार ३०० डॉलर खर्च केले. परंतु, त्यांचा प्रवाश तितका चांगला ठरला नाही, ज्याची त्यांनी अपेक्ष केली होती. पटेल यांनी एअर इंडियाच्या विमानाच्या केबिनची दुरवस्था सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.