चेन्नईतील डॉक्टरांच्या वार्षिक परिषदेतील डान्स परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. सुमारे ५८ सेकंदाच्या या व्हिडिओ फूटेजमध्ये एक महिला डान्सर डॉक्टर पाहुण्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
असोसिएशन ऑफ कोलन अँड रेक्टल सर्जन्स ऑफ इंडियाची ही वार्षिक परिषद १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान चेन्नई येथे पार पडली. त्यात नाचगाणे व खाण्यापिण्याची रेलचेल होती. याच परिषदेतील हा व्हिडिओ आहे. या फूटेजमध्ये काही पुरुष डॉक्टर हातात ड्रिंक्स घेऊन महिला डान्सरसोबत थिरकताना दिसत आहेत. त्यात वयस्कर डॉक्टरही आहेत.
व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यानं या कार्यक्रमातील अश्लीलतेला आक्षेप घेतला आहे. व्यावसायिक परिषदांमध्ये असं ओंगळवाणं प्रदर्शन योग्य आहे का, असा प्रश्न त्यानं केला आहे. त्यानं @IMAIndiaOrg असं टॅग करत इंडियन मेडिकल असोसिएशनलाही काही प्रश्न केले आहेत. 'हे मानवी शरीररचनेचं काही प्रशिक्षण आहे का? म्हातारे डॉक्टर सर्वांसमोर एका महिलेच्या हाताला धरतायत, हा वैद्यकीय प्रॅक्टिसचा कोणता प्रकार आहे?, असं त्यानं म्हटलं आहे.
या व्हिडिओमुळे ऑनलाइन चर्चेला उधाण आले असून, काही युजर्सनी बॉलिवूड आणि इतर अनेक सेलिब्रेशनमध्ये असे डिस्प्ले अनेकदा पाहायला मिळतात, याकडं लक्ष वेधलं आहे. याच कार्यक्रमावर टीका का केली जात आहे, असा प्रश्न काहींनी केला आहे. तर, काहींनी या व्हिडिओवर नापसंती व्यक्त केली आहे. हे वर्तन लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'बॉलिवूडमधील लोक असे प्रकार करून लाखो लोकांचं मनोरंजन करतात ते चालतं, मग यात एखाद्याला वाईट वाटण्याचं कारण काय, अशी विचारणा एका युजरनं केली आहे. तर, ते काहीही चुकीचं करत नसल्याचं किंवा कोणालाही पकडताना दिसत नसल्याचं दुसऱ्या एका नेटकऱ्याचं म्हणणं आहे.
‘हे जर चुकीचं असेल तर धार्मिक सण आणि लग्न समारंभात डीजेच्या तालावर नाचणंही चुकीचं आहे. कायदेशीरदृष्ट्या नाही, पण नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे,’ असं एकानं म्हटलं आहे.
आणखी एकानं लिहिलंय की, ‘तीन दिवसांपूर्वी अमेरिकेत विश्वगुरूंना खूश करण्यासाठी काही महिला नृत्य करत होत्या. त्यात एकही पुरुष नव्हता, मग डॉक्टर काही क्षण एन्जॉय करत असतील तर इतरांच्या पोटात दुखण्याचं कारण काय?'
‘डान्समध्ये काय गैर आहे. नॉर्मल डान्स आहे. एक व्यक्ती फक्त डान्समध्ये स्टेपसाठी हात धरतो,’ असं दुसऱ्या एका युजरनं म्हटलं आहे. डॉक्टरही माणसंच आहेत. त्यांनी मौजमजा का करू नये,' असं एका नेटकऱ्यानं म्हटलंय.
'काय प्रॉब्लेम आहे? अश्लीलता? त्याची व्याख्या कशी कराल? मुलीला हात लावणं? मुलीची परवानगी नाही का? खरंतर माझाही याला विरोध आहे, पण तुमचा विरोध का याचं उत्तर मला हवं आहे. मी म्हणतो की हे माझ्या धार्मिक आचरणाच्या विरोधात आहे म्हणून मी यावर बंदी घालू इच्छितो. पण तुमचा आक्षेप नेमका काय आहे, असा सवाल एका युजरनं डॉक्टरांवर टीका करणाऱ्यांना केला आहे.
'काय प्रॉब्लेम आहे? ड्युटी करून झाल्यानंतर प्रत्येकाला एन्जॉय करण्याचा आणि डान्स करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही म्युझिक डान्स कॉन्सर्टपेक्षा यात काय वेगळं आहे?,' अशी विचारणा एकानं केली आहे.
एका युजरनं 'हे लज्जास्पद आहे', अशी टीका केली आहे. हा काय फालतुपणा आहे? याला परवानगी @IMAIndiaOrg आहे? का, असा प्रश्न त्यानं केला आहे.