Viral News: असाममध्ये एका गेंड्याने एका दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत संबंधित व्यक्तीचा तडफडून मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, स्त्याच्या मधोमध गेंडा उभा आहे. गेंड्याला पाहून काही लोक रस्त्याच्या एका बाजूला उभा आहेत. तर, दुसऱ्या बाजूला दुचाकीस्वार उभा आहे. जेव्हा गेंड्यांनी दुचाकीस्वारवर हल्ला केला,जीव वाचवण्यासाठी त्याने शेतात धाव घेतली. परंतु, गेंड्याने त्याचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला केला.
लोकांनी ओरडाओरडा करून गेंड्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. गेंड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वारचा मृत्यू झाला. सुद्दाम हुसेन असे गेंड्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो घटनास्थळावरून ३० किलोमीटर दूर असलेल्या कामरूप महानगर जिल्ह्यातील रहिवासी होता.
वन अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'गेंडा वन्यजीव अभयारण्यातून बाहेर आला आहे. आम्ही घटनेचा तपास करत आहोत. 'या परिसरात नेहमीच जंगली प्राण्याचा वावर पाहायला मिळतो. या परिसरातून ये-जा करताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी', असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. गेंडा ताशी ५५ किलोमीटर वेगाने धावू शकतो, एका गेंडाचे वजन २ हजार ८०० किलोपर्यंत असू शकते, असेही सांगितले जाते.
चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी (२१ सप्टेंबर २०२४) ही माहिती दिली. संबंधित मुलाचा मृतदेह घटनेच्या दिवशी सकाळी डब्ल्यूसीएल परिसरात सापडला. मृतदेह आढळल्यापूर्वी आदल्या दिवशी हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. सिनाळा गावात राहणारे भावेश ठाकूर हा शौचासाठी बाहेर गेला असताना ही घटना घडली. रात्रभर शोधाशोध करूनही भावेश ठाकूर सापडला नाही. मृतांच्या नातेवाइकांना प्राथमिक नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्यात आले.