Biker Harasses Couple In Bengaluru: बंगळुरूच्या सर्जापूर रोडवर एका दुचाकीस्वराने कारमधील जोडप्याला त्रास दिला आणि कारच्या काचा फोडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अशा दुचाकीस्वारविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे. बंगळुरू पोलिसांनी रहिवाशांना अशा आपत्कालीन परिस्थितीत ११२ वर कॉल करण्याचा सल्ला दिला.
कम्युनिटी एक्स हँडल सिटिझन मूव्हमेंटने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सर्जापूर रोडवरील १५२२ पबजवळ दुचाकीस्वाराने कार थांबवली आणि चालकाला कारमधून बाहेर पडण्यास सांगितले. परंतु, कारचालकाने खिडकीतून खाली उतरण्यास नकार दिला. त्यानंतर दुचाकीस्वारने कारची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कारचालकाने आपण कुटुंबासोबत असून मला जाऊ द्या, अशी विनंती केली. मात्र, दुचाकीस्वाराने रागाच्या भरात वायपर पकडून कारच्या पुढील काचा फोडल्या. सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. कारमधील महिला मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसली आणि काही लोकांनी मध्यस्थी करून दुचाकीस्वारला संबंधित दाम्पत्यावर हल्ला करण्यापासून रोखले. ही संपूर्ण घटना कारचालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केली. बंगळुरूत अशी घटना घडण्याची पहिली वेळ नसून याआधी चोरट्यांनी नागरिकांच्या गाड्या अडवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला आहे, असे स्थानिकांनी म्हटले आहे.
रिपोर्ट सिटिझन मूव्हमेंटने एक्स पोस्टमध्ये लिहिले की, ‘सर्जापूर रोडवर काय चालले आहे? कारमधील एका कुटुंबावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांचा हल्ला! कृपया मदत करा! ही घटना रात्री साडेदहा वाजता गल्ली १५२२, दोडाकन्नळी जंक्शन येथे घडली! हे दाम्पत्य पोलीस ठाण्यात पोहोचले.’
दरम्यान, सर्जापूर परिसरात अशा प्रकारच्या घटना सर्रास घडत असून, स्थानिक नसलेल्यांना दररोज त्रास दिला जात असल्याची तक्रार इंटरनेटवरील लोकांनी केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, ‘बेंगळुरूमध्ये ही समस्या आहे. मलाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले आणि ते आमच्यासोबत अकल्पनीय गोष्टी करू नयेत म्हणून मला माझ्या कुटुंबासोबत पळून जावे लागले. अशा दुचाकीस्वारांची टोळी सभ्य कुटुंबातील कारला धडक देतात आणि त्यांच्या कारच्या काचा फोडून मारहाण करतात, लुटतात आणि महिलांची छेड काढतात.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘अशा घटना वाढत असल्याने या भागात पोलिसांनी गस्त वाढवण्याची वेळ आली आहे.’