AP Student Suicide News: आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील नारायणा महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली. वर्गाच्या वेळेत घडलेली ही धक्कादायक घटना महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेने महाविद्यालय प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, एक विद्यार्थी तास सुरू असताना वर्गातून बाहेर पडतो आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारतो. उडी मारण्यापूर्वी तो विद्यार्थी कठड्यावर चढण्यापूर्वी आपली चप्पल काढतो. या घटनेनंतर त्याचे वर्गमित्र धावत वर्गाबाहेर येतात. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील वेळेत दिसत आहे.
या घटनेमागील कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे गंभीर पाऊल का उचलले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेच्या सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी बोलून मानसिक स्थितीबद्दल माहिती गोळा केली जात आहे.
संबंधित बातम्या