Viral News : हैदराबादच्या कुकटपल्ली भागात एका विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका YouTuber नं दुचाकीवरून येत भरदिवसा रस्त्यावर हवेत नोटा फेकल्या. अचानक नोटा खाली पडू लागल्याने रस्त्यावर मोठा गोंधळ झाला. नागरिक या नोटा गोळा करण्यासाठी सैरावैरा पळू लागले होते. या घटनेमुळे या परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.
हैदराबादच्या कुकटपल्ली भागात राहणाऱ्या एका यूट्यूबरने प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे कृत्य केले. दोघे जण दुचाकीवरून येतात. दुचाकीवरील मागे बसलेल्या मुलाच्या हातात नोटांचे बंडल होते. तर समोरील दुचकीवर असलेले त्याचे मित्र या घटनेचे चित्रीकरण करत होते. मागे बसलेल्या मुलाने हातातील नोटा हवेत उंच फेकल्या. यामुळे भर रस्त्यावर नोटांचा पाऊस पडल्या सारखे दृश्य तयार झाले. अचानक हवेतून नोटा खाली पडू लागल्याने त्या गोळा करण्यासाठी नागरिक सैरावैरा धावू लागले. काही लोक त्यांच्या दुचाकीच्या मागे तर काही जण ऑटो रिक्षाने त्यांच्या मागे नोटा गोळा करण्यासाठी धावू लागले होते. तर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी खाली पडलेल्या नोटा उचलण्यासाठी रस्त्यावर गर्दी केली होती. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
मात्र, प्रसिद्धीसाठी केलेल्या या स्टंटबाजीमुळे रस्त्यावरील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. व्हिडिओमध्ये मुलांनी केलेल्या या कृत्यामुळे रस्त्यावर अनेक अपघात झाले. युट्युबरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला पण त्याचवेळी नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर टीका देखील केली आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी यूट्यूबरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा निषेध करत अनेकांनी याला बेजबाबदार कृत्य म्हटलं आहे, ज्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेला आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, जनक्षोभ असूनही, वृत्त लिहिपर्यंत हैदराबाद पोलिसांनी युट्यूबरवर अद्याप कारवाई केलेली नाही.