Viral News : सध्या ऑनलाइन वस्तु ऑर्डर करण्याचा ट्रेंड वाढला आहे. नागरिक ऑनलाइन शॉपिंगला पसंती देतात. अनेक वेळा वस्तु न आवडल्यामुळे किंवा काही इतर कारणांमुळे ग्राहकाकडून ऑर्डर कॅन्सल केली जाते. त्यामुळे वस्तु वितरण करणारी कंपनी संबंधित व्यक्तीला पैसे ठरलेल्या कालावधीत परत करून डिलिव्हरी देत नाही. मात्र, एका तरुणासोबत काही भलतंच घडलं आहे. त्याच्या सोबत घडलेली घटना त्याने सोशल मिडियावर पोस्ट केल्यावर ती व्हायरल झाली आहे.
सहसा, ऑर्डर रद्द केल्यानंतर, लोक असे गृहीत धरतात की संबंधित वस्तु पुन्हा मिळणार नाही. एक व्यक्तीला जॅकपॉट लागला आहे. त्याने दावा केला आहे की, रद्द केलेली ऑर्डर त्याला २ वर्षानंतर मिळाली आहे. त्याने ही घटना त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ॲमेझॉननेही या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्याने हे प्रकरण अधिकच गमतीशीर झाले आहे.
जय नावाच्या या व्यक्तीने त्याच्या पोस्टमध्ये दावा केला आहे की त्याने १ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रेशर कुकरची ऑर्डर दिली होती. नंतर त्याने आपली ऑर्डर रद्द केली. या ऑर्डरसाठी त्याने दिलेल्या रकमेचा त्याला रिफंड देखील मिळाला. यानंतर ही ऑर्डर तो विसरून गेला. यानंतर दोन वर्षांनी २८ ऑगस्ट २०२४ रोजी जेव्हा त्याच्या घरी त्याने ऑर्डर केलेला प्रेशर कुकर मिळाला. या घटनेमुळे जय आश्चर्यचकित झाला. जयने आपल्या पोस्टमध्ये ॲमेझॉनचे आभारही मानले आहेत. त्याने लिहिले आहे की, दोन वर्षांनी माझी ऑर्डर वितरीत केल्याबद्दल Amazon चे आभार. एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर मिळालेला हा प्रेशर कुकर नक्कीच खूप खास आहे. यावर ॲमेझॉननेही प्रतिक्रिया दिली आहे. हे जाणून आम्हाला खूप वाईट वाटत असल्याचं त्यांनी लिहिलं आहे. कृपया आमच्या सपोर्ट टीमला याची तक्रार करा. यावर प्रतिक्रिया देताना जयने लिहिले की, मी काय तक्रार करू? ही ऑर्डर २०२२ मध्येच रद्द करण्यात आली होती आणि पैसे देखील मिळाले होते. असे असूनही, आता डिलिव्हरी मिळाली आहे. मी का पैसे देऊ?
जयच्या पोस्टवर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्याची डिलिव्हरी मंगळावरून आली आहे असे काही लोकांनी म्हटले आहे. काही लोकांना त्यांच्या वस्तूंच्या वितरणात विलंब झाल्याच्या घटना आठवल्या. त्याचबरोबर काही लोकांनी या घटनेवर जोक्सही शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलं आहे की हे कुशल कारागिरांनी तयार केले असावे. दुसऱ्याने लिहिले की, तुम्हाला आनंद झाला पाहिजे की ते कस्टम मेड आहे. तुमच्या ऑर्डरसाठी ॲल्युमिनियम खनन आणि प्रक्रिया केलेले असणे आवश्यक आहे. दुसऱ्याने लिहिले की तुमची ऑर्डर दुसऱ्या जगातून आली आहे, त्यामुळे प्रेशर कुकर मिळायला दोन वर्षे लागली.