सामान्यपणे वीज ग्राहकांची तक्रार असते की, वीज वापर कमी करूनही त्यांचे लाईट बिल अधिक येते. मात्र बिहार राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बगहा-२ परिसरातील हरका गावात लोकांच्या वेगळ्याच तक्रारी आल्या आहेत. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, या गावात काही असे लोक आहेत, ज्यांनी विजेचे कनेक्शनच घेतले नाही. मात्र त्यांच्या नावावर विजेचे बिल येत आहे.
विना कनेक्शन २५ हजाराचे वीज बिल -
हा प्रकार चंपारण जिल्ह्यातील बगहा-२ ब्लॉकमधील हरका गावातील आहे. येथे डझनभर लोकांना चुकीचे वीज बिल आले आहे. जर १००-२०० रुपयांची गोष्ट असती तर लोकांनी याला महत्व दिले नसते. मात्र येथे तर लाख रुपयांचे बिल आले आहे. या वीज बिलामुळे पीडित ग्रहण सहनी, चम्पा देवी, प्रह्लाद आदि त्रस्त आहेत. विशेष म्हणजे काही ग्रामस्थांनी विजेचे कनेक्शनच घेतलेले नाही. तरीही त्यांना विजेचे बिल आले आहे. प्रल्हाद यांनी सांगितले की, अजूनपर्यंत विजेचे कनेक्शनच घेतले नाही तरीही २५ हजाराचे बिल आहे आहे. याची दखलही कोणी घेत नाही.
दोन एलईडी बल्बचे बिल ९४ हजार रुपये -
ग्रहण सहनी यांनी सांगितले की, त्यांच्या नावावर ९४ हजाराचे बिल आले आहे. त्यांनी सांगितले की, घरात केवळ दोन ते तीनच एलईडी बल्ब आहेत. तसे पाहिले तर याचे बिल केवळ १००-१५० रुपये आले पाहिजे. मात्र याचे बिल आले आहे तब्बल ९४ हजार रुपये. याच समस्येने चम्पा देवीही त्रस्त आहेत. चम्पा देवी यांनी सांगितले की, घरात केवळ एकच एलईडी बल्ब आहे मात्र याचे बिल आले आहे १८ हजार. हीच समस्या हरका गावातील अनेक ग्रामस्थांची आहे.
वीज कंपनीचे स्पष्टीकरण -
याबाबत बगहा गावाचे कार्यपालक अभियंता आलोक अमृतांशु यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक शनिवार वीज विभागाकडून शिबिर आयोजित करून अशा समस्या सोडवल्या जातात. या शनिवारीही हे काम केले जात आहे. हरका गावातील तक्रारी त्यांच्यापर्यंत आल्या असून त्यांनी सांगितले की, गावाची पाहणी करून समस्येचे निराकरण केले जाईल.
संबंधित बातम्या