Uttar Pradesh Deoria Viral News: उत्तर प्रदेशातील देवरिया येथे दोन महिलांच्या लग्नाचे प्रकरण आता चर्चेत आले आहे. पतींच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून दोन महिलांनी एकमेकांशी लग्न केले. दोन्ही महिलांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघींनी आपल्या पतीला सोडून एकमेकींशी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांच्या आगळ्यावेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
उत्तर प्रदेशच्या देवरियातील रुद्रपूर येथील दुधेश्वर नाथ मंदिरात या महिलांनी एकमेकींशी लग्न केले. या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पतींना दारूचे व्यसन होते. अनेकदा समजावूनही त्यांनी दारू पिणे बंद केले नाही. एवढेच नव्हेतर, दारुच्या नशेत पती त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असे. नेहमीच्या त्रासाला वैतागून या महिला पतीपासून वेगळ्या झाल्या. त्यानंतर इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून महिलांची एकमेकींसोबत मैत्री झाली आणि उर्वरित आयुष्य एकमेकांना जीवनसाथी मानून जगण्याचा निर्णय घेतला. यातील एका महिलेने सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून त्या इकडे- तिकडे फिरत होत्या. अखेर मंदिरात जाऊन त्यांनी लग्न केले. लग्नानंतर दोघेही गोरखपूरमध्ये भाड्याच्या घरात राहतील आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काम करतील.
या महिलांची ओळख इंस्टाग्रामवर झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. रांची येथील रहिवासी गुंजा नावाच्या मुलीचे लग्न रुद्रपूरच्या नाथबाबात झाले होते. परंतु, तिचा पती दारुच्या नशेत तिला मारहाण करायचा. या त्रासाला वैतागून गुंजा आठ वर्षांपूर्वीच पतीपासून वेगळी झाली आणि गोरखपूरमध्ये एका खोलीत एकटीच राहू लागली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर तिची ओळख कविता नावाच्या महिलेशी झाली. कविता देखील विवाहिती होती आणि तिच्या तीच्या मद्यपानाच्या सवयीला कंटाळली होती. यानंतर दोघांमधील जवळीक वाढली आणि ते दोघेही प्रेमात पडले. दोघांनीही समाजाची पर्वा न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मंदिरात जाऊन लग्न केले.
@suryakantvsnl या ट्विटर अकाऊंटवरून या लग्नाबाबत ट्वीट करण्यात आली. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले की, 'देवरियामध्ये दोन विवाहित महिलांनी एकमेकांशी लग्न केले. या महिलांचे म्हणणे आहे की, त्या त्यांच्या पतींच्या छळाला कंटाळून वेगळ्या राहत होत्या. त्यानंतर त्यांची इंस्टाग्रामवर मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. आता त्यांनी एकमेकांना हार घातले आणि एकमेकांच्या केसांना कुंकू लावून एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली.'
संबंधित बातम्या