Viral News : कर्नाटकमध्ये एक जरा गमतीशीर व रंजक प्रकरण समोर आलं आहे. म्हशीवरील मालकी हक्क निश्चित करण्यासाठी चक्क डीएनए चाचणी करण्यात आली आहे. खरं तर ही म्हैस एका मंदिराची असून येथे येणारे भाविक तिची पूजा करतात. परंतु म्हशीचा मालक कोण ? यावरून दोन गावांमध्ये सध्या वाद उफाळला आहे.
हे प्रकरण कर्नाटकातील देवनागरी जिल्ह्यातील आहे. जिथे कुनिबेलकर आणि कुलगट्टे गावांमध्ये या म्हशीवरून वाद सुरू झाला आहे. दोन्ही गावांमधील अंतर सुमारे ४० किमी आहे. या म्हशीला सध्या शिवमोगा गोशाळेत पोलिस बांदोबस्तात ठेवण्यात आले आहे. २०२१ मध्ये देखील देवनागरी जिल्ह्यात असाच एक वाद झाला होता. त्यावेळी देखील म्हशीवरील मालकी हक्काचा वाद डीएनए चाचणीद्वारेच मिटला होता.
काय आहे प्रकरण ?
आठ वर्षांपूर्वी कुणीबेलकर गावातील करिअम्मा देवीला एक म्हैस मंदिराला अर्पण करण्यात आली होती. तर बेळेकर गावात नुकतीच एक म्हैस सापडलीअसून ही म्हैस होनाळी तालुक्यातील कुलगट्टे गावातून बेपत्ता झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. कुलगट्टे गावातील लोकांनी या म्हशीला आपल्या घरी नेले. याच गावातील रहिवासी मंडप्पा रंगनवार यांनी सांगितले की, म्हैस दोन महिन्यांपासून बेपत्ता होती. आता कुणीबेलकर गावातील लोक या म्हशीवर आपला हक्क सांगू लागले आहेत. या प्रकरणी वाद वाढल्यानंतर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
म्हशीच्या वयावरूनही वाद आहे. कुणीबेलकर ग्रामस्थांनी ही म्हैस ८ वर्षांची असल्याचा दावा केला. तर तर कुलगट्टे येथील ग्रामस्थांनी म्हशीचे वय तीन वर्षे असल्याचा दावा केला आहे. पशुवैद्यकांनी तपासणी केल्यानंतर या म्हशीचे वय ६ वर्षे असल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे कुनिबेलकर ग्रामस्थांचा दावा अधिक प्रबळ झाला आहे. मात्र, कुलगट्टे गावातील लोकांना हा दावा वा चाचणी दोन्ही मंजूर नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी कुलगट्टे गावातील सात जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून डीएनए चाचणीची मागणी केली. देवनागरीचे अतिरिक्त एसपी विजयकुमार संतोष यांनी सांगितले की, डीएनए नमुने गोळा करण्यात आले आहेत. डीएनए चाचणीचा अहवाल आल्यावर या प्रकारचा सोक्ष मोक्ष लागणार आहे.
संबंधित बातम्या