IndiGo airline viral news : तुम्ही क्यूट म्हणजेच गोंडस दिसत असाल आणि तुम्ही इंडिगो एयरलाइनने प्रवास करत असाल तर तुम्हाला क्यूट दिसण्याची फी भरावी लागणार आहे. सध्या इंडिगो एअरलाइन्सच्या या 'क्यूट फी'बाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या बाबत एका यूझरने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये कंपनीने तिकीटासोबत अनेक शुल्क आकारले आहेत. आता गोंडस असल्याने प्रवाशांकडून शुल्क आकारले जाणार का ? असा प्रश्न या यूझर विचारला आहे. इंडिगो एअरलाइन्सनेही या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले. सध्या ही पोस्ट व्हेरल होत आहे.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर, _shrayanshsingh नावाच्या वापरकर्त्याने Indigo Airlines टॅग करत पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी ३ प्रश्न विचारले आणि तिकिटाची संपूर्ण माहिती दिली. स्क्रीनशॉटनुसार, कंपनीने एकूण १०.०२३ रुपयांच्या तिकिटावर ५० रुपये क्यूट फी म्हणून आकारले होते. याशिवाय त्यांनी युजर डेव्हलपमेंट फीसाठी १ हजार ३ रुपये आणि एव्हिएशन सिक्युरिटी फीसाठी २३६ रुपये अकरले होते. यूझरने वरील तीन शुल्कांवर प्रश्न उपस्थित केले होते.
युजर म्हणाला, 'हे क्यूट फी प्रकरण काय आहे? तुम्ही वापरकर्त्यांना गोंडस म्हणून शुल्क आकारता का? की विमाने गोंडस वाटतात म्हणून पैसे घेता?' त्याचा पुढचा प्रश्न होता, 'ही युजर डेव्हलपमेंट फी म्हणजे काय?' जेव्हा मी तुमच्या विमानात प्रवास करत असतो, तेव्हा तुम्ही माझा विकास कसा कराल?' याशिवाय सुरक्षेसाठी शुल्क आकारण्यावरही त्याने आक्षेप घेतला. ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी कंपनीवर टीका देखील केली आहे.
यानंतर विमान कंपन्यांकडून क्यूट चार्जेसबाबत स्पष्टीकरणही देण्यात आले. कंपनीने म्हटले की, 'आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की क्यूट चार्ज म्हणजे कॉमन यूजर टर्मिनल इक्विपमेंट चार्ज. ही रक्कम आहे जी विमानतळावरील मेटल डिटेटिंग मशीन, एस्केलेटर आणि इतर उपकरणांच्या वापरावर आकारली जाते.