Viral Video : हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे कधी आकाशातून पाऊस पडतो, तर कधी बर्फवृष्टी होते. त्याचबरोबर आकाशातून पडणारे दवाचे थेंबही पानांवर दिसतात. पण ब्राझीलमधील मिनास गेराईस राज्यातील साओ थॉम दास लेट्रास शहरात जे घडले त्यामुळे लोक भयभीत झाले आहेत. या ठिकाणी आकाशातून पाणी किंवा गारा नाही तर शेकडो कोळी किडे पडू लागले. अचानक आकाशातून किडे पडू लागण्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
जेव्हा स्थानिकांनी आकाशातून कोळी किडे पडताना पाहिले तेव्हा सुरुवातीला त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. हे दृश्य एखाद्या हॉरर चित्रपटासारखे दिसत होता. लोकांनी आपल्या मोबाईलमधून या विचित्र घटनेचे व्हिडिओ बनवले, जे आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, ही गूढ घटना चमत्कार किंवा भीतीदायक घटना नसून पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. जीवशास्त्रज्ञ कायरॉन पासोस यांच्या मते, स्टेगोडिफस आणि अँलोसिमस सारख्या कोळ्यांच्या काही प्रजाती मोठ्या जाळ्यांमध्ये एकत्रितपणे राहतात. कोळ्यांची ही प्रजाती उंचावर आपले जाळे तयार करते. जेव्हा वेगाने वारा वाहतो तेव्हा त्यांची संपूर्ण वसाहतच हवेत उडते, त्यामुळे आकाशातून ते मोठ्या प्रमाणात खाली पडतात, तेव्हा जणू कोळ्यांचा पाऊस होत असल्याचा भास होतो.
ब्राझीलमध्ये कोळ्यांचा पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये याच भागात अशीच एक घटना पाहायला मिळाली होती, ज्याने संपूर्ण देश हादरला होता. ही घटना पाहून काही जण घाबरले, तर काहींनी याला नैसर्गिक सौंदर्य असे म्हटले. मात्र, कोळ्यांची ही प्रजाती मानवासाठी हानिकारक नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे सांगण्यात येत आहे. पण अचानक आकाशातून कोळी पडताना कुणाला दिसले तर त्याच्या हृदयाचे ठोके नक्कीच वेगवान होतील!
संबंधित बातम्या