Kerala Viral News: अन्न आरामात खावे, असे अनेकदा सांगितले जाते. जर आपण पटकन खाल्ले तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कांजीकोड येथे आयोजित इडली खाण्याच्या स्पर्धेदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. स्पर्धा जिंकण्यासाठी मृत व्यक्तीने एकाचवेळी तीन इडल्या खाल्ल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि उपचारापूर्वीचा त्याला मृत्युने गाठले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश (वय, ५०) असे मृताचे नाव असून तो पलक्कडमधील अलमाराम येथील रहिवासी आहे. ओणमनिमित्त कोलापूरमधील नलमाराम येथे आयोजित इडली खाण्याच्या स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. स्पर्धेत भाग घेताना सुरेशने एकाच वेळी तीन इडली गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले.
चुलीमाडा प्रभाग सदस्य मिनमणी आर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेशने इडली गिळण्याचा प्रयत्न करताच ती त्याच्या घशात अडकली आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सुरेशची प्रकृती खालावल्याने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना वालयार येथील दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
व्यवसायाने ट्रक चालक असलेल्या सुरेश यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबाना मोठा धक्का बसला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सुरेशच्या निधनाने ओणमच्या आनंदाचे दु:खात रुपांतर झाले.
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात फुग्यामुळे एका १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मयत मुलाने शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना फुगा खरेदी केला. पुढे वाटेत त्याने फुगा फुगवण्यास सुरुवात केली. त्यावेळी अचानक फुगा त्याच्या घशात अडकला. या घटनेची माहिती मिळताच शाळेतील शिक्षकांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, मुलाची प्रकृती आणखी बिघडल्याने पालकांनी त्याला पठाणकोट येथील अमनदीप रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांना मुलाच्या गळ्यातील फुगा काढण्यात यश आले. मात्र, त्याची प्रकृती आणखी बिघडली. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. याआधी जत्रेत स्मोक बिस्कीट खाल्ल्याने एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला होता.