मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! कामावरून परत जात असतांना बिहारमधील दोन मजुरांची हत्या; एक दहशतवादीही ठार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! कामावरून परत जात असतांना बिहारमधील दोन मजुरांची हत्या; एक दहशतवादीही ठार

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! कामावरून परत जात असतांना बिहारमधील दोन मजुरांची हत्या; एक दहशतवादीही ठार

Dec 15, 2024 10:13 AM IST

Manipur Violence : मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. बिहारच्या दोन तरुणांची हत्या करण्यात आली आहे. काकचिंग-वाबागाई रस्त्यावरील पंचायत कार्यालयाजवळ ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी घडली. अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! कामावरून परत जात असतांना बिहारमधील दोन मजुरांची हत्या; एका दहशतवादीही ठार
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! कामावरून परत जात असतांना बिहारमधील दोन मजुरांची हत्या; एका दहशतवादीही ठार (HT_PRINT)

Manipur Violence : मणिपूरमधून पुन्हा हिंसाचार उफाळला आहे.  हिंसाचाऱ्याच्या  दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शनिवारी  तिघांचा मृत्यू झाला. यातील दोन जण बिहारमधील मजूर होते. दरम्यान, पोलिसांनी चकमकीत एका दहशतवाद्यालाही कंठस्नान घातले आहे. काकचिंग जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सुनेलाल कुमार (वय १८) आणि दशरथ कुमार (वय १७) अशी हत्या करण्यात आलेल्या मजुरांची नावे आहेत. हे दोघेही बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील राजवाही गावचे  रहिवासी आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही मजूर  काकचिंगमधील मैतेई बहुल भागात राहत होते. काकचिंग-वाबागाई रस्त्यावरील पंचायत कार्यालयाजवळ शनिवारी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

कामगारांवर झालेल्या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मणिपूरमध्ये मेइतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू असलेल्या वांशिक संघर्षामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मणिपूर पोलिसांच्या कमांडोंनी शनिवारी थौबल जिल्ह्यातील सालुंगफाम मनिंग लेकाई येथे संशयित दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. तर अन्य सहा जणांना अटक करण्यात आली आहे. लैशराम प्रियम ऊर्फ लोकटक (वय १६) असे मृत दहशतवाद्याचे नाव आहे. तो प्रीपाक या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य होता.

या भागात सशस्त्र दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास सालुंगफाम हायस्कूलजवळ शोधमोहीम राबविण्यात आली. या चकमकीत प्रियमला गोळी लागली. त्याला  इम्फाळच्या राज मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी तीन इन्सास रायफल, एक एसएलआयआर रायफल, एक .३०३ रायफल, एक एएमओजीएच रायफल, अनेक मॅगझिन आणि दारूगोळा जप्त केला आहे. पोलिसांनी एक चारचाकी वाहनही जप्त केले.

प्रियमची आई लैशराम गीतमाला यांनी सांगितले की, कुकी अतिरेक्यांच्या हल्ल्यांपासून गावांचे रक्षण करण्यासाठी त्यांचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी घर सोडून गेला होता. प्रियम हायस्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट परीक्षेची तयारी करत असल्याचेही त्याने सांगितले. हा हिंसाचार संपायला हवा, असे त्या म्हणाल्या. जर हिंसाचार थांबला नाही, तर अनेक कुटुंबांतील तरुण मुलांचा मृत्यू होईल, जे मी आज अनुभवलं आहे."

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर