बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून पुन्हा हिंसाचार, जमावाकडून बाप-लेकाची निर्घृण हत्या; परिस्थिती नियंत्रणाबाहेर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून पुन्हा हिंसाचार, जमावाकडून बाप-लेकाची निर्घृण हत्या; परिस्थिती नियंत्रणाबाहेर

बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून पुन्हा हिंसाचार, जमावाकडून बाप-लेकाची निर्घृण हत्या; परिस्थिती नियंत्रणाबाहेर

Updated Apr 12, 2025 06:54 PM IST

Bengal Violence : बंगालमध्ये वक्फ कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं, ज्यात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला.

वक्फ कायद्यावरून बंगालमध्ये हिंसाचार
वक्फ कायद्यावरून बंगालमध्ये हिंसाचार (Video Grab)

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं, ज्यात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारी हिंसाचार उसळला होता आणि आतापर्यंत ११८ जणांना अटक करण्यात आली आहे. परिस्थिती पाहता पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर करावा लागला, तर काही भागात सीमा सुरक्षा दलाचीही (बीएसएफ) मदत घेण्यात आली आहे.

जमावाने केली पिता-पुत्राची हत्या -

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी शमशेरगंजच्या जाफराबाद भागात हिंसक जमावाने अचानक गावावर हल्ला केल्याने परिस्थिती बिघडली. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगा या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली.

शुक्रवारी शुक्रवारच्या नमाजनंतर मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि वक्फ कायद्याविरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली. शमशेरगंजला लागून असलेल्या धुलियान भागात आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ रोखून धरला, पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली आणि काही वाहनांना आग लावली. या दुर्घटनेत १० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. काही पोलिसांना जीव वाचवण्यासाठी मशिदीत आश्रय घ्यावा लागला. शनिवारी हा हिंसाचार धुलियानमध्ये पसरला आणि तेथे एका व्यक्तीला गोळी लागल्याचे वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर केला.

वक्फ कायद्यावरून वातावरण तापलं -

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, "ज्या कायद्याबद्दल लोक नाराज आहेत तो कायदा आम्ही बनवला नाही. हा केंद्र सरकारचा कायदा असून बंगालमध्ये हा कायदा लागू होणार नाही, असे आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे. मग ही दंगल कशासाठी?', असा सवाल करत भाजपने ममता सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सत्तेत आल्यास अल्पसंख्याकांवरील अशी गुंडगिरी आणि हिंसाचार पाच मिनिटांत संपवू, असे बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी म्हटले आहे. "

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर