Vinesh Phogat wins election : हरयाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून काही जागांचे निकाल हाती आले आहेत. भाजपनं निकालांमध्ये आघाडी घेतली असली तरी काँग्रेसच्या बहुतेक महत्त्वाच्या उमेदवारांनी निराशा केलेली नाही. कुस्तीपटू विनेश फोगाट यापैकीच एक आहे. विनेशनं आपली पहिली-वहिली निवडणूक मोठ्या फरकानं जिंकली आहे.
आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यातून निवृत्ती घेतलेल्या व भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या फोगाट हिनं विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनं तिला जुलाना (Julana) मतदारसंघातून रिंगणात उतरवलं होतं. या मतदारसंघावर सर्वांच्या नजरा होत्या. भारतीय जनता पक्षानं योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली होती.
जुलाना मतदारसंघात सर्व १५ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. विनेश फोगाट हिनं पहिल्या निवडणुकीत ६५०८० मतं मिळवली. तर, तिचे प्रतिस्पर्धी भाजपचे योगेश कुमार बैरागी यांना ५९०६५ मत मिळाली आहेत. फोगाट हिनं ६०१५ मतांनी हा निवडणूक जिंकली आहे.
एका सर्व्हेनुसार काँग्रेसला ही जागा जिंकणं सोपं नव्हतं. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यावेळी काँग्रेसला अवघी १२ टक्के मतं मिळाली होती. जेजेपीचे अमरजीत ढांडा येथून निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाले. मात्र, या निवडणुकीत जेजेपीचा प्रभाव कुठंही जाणवला नाही. जुलानामध्येही तीच परिस्थिती होती. मात्र भाजपनं इथून प्रचंड जोर लावला होता. तर, आम आदमी पक्षानंही उमेदवार उतरवल्यानं काँग्रेसची चिंता वाढली होती. मात्र शेवटी विनेशनं बाजी मारली.
विनेश फोगाट हिची लोकप्रियता आणि काँग्रेसला अनुकूल असलेलं वातावरण बघता ही निवडणूक एकतर्फी होईल, असं वाटलं होतं. मात्र, योगेश कुमार बैरागी यांनी विनेशला कडवी टक्कर दिली. मतमोजणीच्या दरम्यान विनेश फोगाट अनेकदा पिछाडीवर गेली होती. मात्र, जसजशी मतमोजणी पुढं सरकत गेली, तसा विनेश फोगाट आणि योगेश कुमार यांच्या मतांमधील फरक वाढत गेला आणि विनेशच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.
संबंधित बातम्या