Haryana Assembly Elections 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा आखाडा गाजवून शेतकरी आंदोलनात उतरलेली कुस्तीपटू विनेश फोगाट आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर बजरंग पुनिया देखील हरयाणा विधानसभेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
दोन्ही कुस्तीपटूंनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी दिल्लीत भेट घेतली. हे दोघेही आपल्या सध्याच्या पदांचा राजीनामा देण्याची शक्यता आहे, असं एएनआयनं म्हटलं आहे. पॅरिस ऑलिंपिकमधून परतल्यानंतर विनेश फोगाटनं हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांची भेट घेतली होती. त्यानंतर या दोघांनीही आज नवी दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच त्यांनी राहुल यांची भेट घेतली. त्यामुळं हे दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. शेतकरी आंदोलनाचं एक प्रमुख केंद्र असलेल्या हरयाणात सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भारतीय जनता पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याच्या प्रयत्नात आहे. तर, काँग्रेस सत्ता खेचून आणण्यासाठी लढणार आहे. आम आदमी पक्षाशी आघाडीची बोलणीही त्यांनी सुरू केली आहेत. तसंच, उमेदवारांची यादीही जवळपास निश्चित केली आहे. या यादीत बजरंग पुनिया व विनेश फोगाट यांचं नाव असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
विनेश फोगाट नुकतीच शंभू सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाली होती. त्यावेळी विनेशला निवडणूक लढवण्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिनं थेट उत्तर देणं टाळलं होतं. 'मला याबद्दल बोलायचं नाही. मी माझ्या कुटुंबियांना (शेतकऱ्यांना) भेटायला आलो आहे. त्यामुळं मीडियानं माझ्या ऐवजी त्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावं. अन्यथा त्यांचा संघर्ष वाया जाईल. मी एक खेळाडू आणि भारताचा नागरिक आहे. माझ्यासाठी निवडणुका हा प्राधान्याचा विषय नाही. माझं लक्ष फक्त शेतकऱ्यांच्या कल्याणावर आहे, असं ती म्हणाली होती.
किमान आधारभूत किंमतीच्या कायदेशीर हमीसाठी शेतकरी आंदोलन सुरू असून ३१ ऑगस्ट रोजी या आंदोलनाचा आजचा २०४ वा दिवस आहे.
विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह काही कुस्तीपटूंनी खेळाडूंच्या लैंगिक शोषणाविरोधात आंदोलन केलं होतं. हे आंदोलन देशभरात गाजलं होतं. त्यानंतर विनेश फोगाट हिनं ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकापर्यंत माजल मारली होती. मात्र, वजनातील फरकामुळं तिला पदकाला मुकावं लागलं. त्यानंतर तिनं कुस्तीच्या आखाड्यातून निवृत्तीी घोषणा केली होती.