कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय आखाड्यात उतरताच डागली भाजपवर तोफ-vinesh phogat bajrang punia join congress ahead of haryana assembly elections ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय आखाड्यात उतरताच डागली भाजपवर तोफ

कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय आखाड्यात उतरताच डागली भाजपवर तोफ

Sep 06, 2024 04:40 PM IST

Haryana Assembly Elections 2024 : देशातील प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोघांनीही हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

विनेश फोगट, बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय आखाड्यात उतरताच भाजपवर डागली तोफ
विनेश फोगट, बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय आखाड्यात उतरताच भाजपवर डागली तोफ

Vinesh Phogat, Bajrang Punia joins congress : प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. पक्ष प्रवेशानंतर विनेश आणि बजरंग दोघेही निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन्ही कुस्तीपटूंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर वरिष्ठ नेत्यांची १० राजाजी मार्गावरील निवासस्थानी भेट घेतली. तत्पूर्वी, ४ सप्टेंबर रोजी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. त्याच भेटीत त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाल्याचं मानलं जातं. काँग्रेस प्रवेशाच्या आधी विनेशनं भारतीय रेल्वे सेवेचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेश करताच अपेक्षेप्रमाणे दोघांनीही केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर तोफ डागली. महिलांवरील अत्याचाराविरोधात लढण्यासाठी तयार असलेल्या पक्षात सहभागी झाल्याचा मला अभिमान आहे, असं विनेश म्हणाली. 

‘कुस्ती प्रवासात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल विनेशनं देशातील जनतेचे आभार मानले. 'मी काँग्रेस पक्षाचीही आभारी आहे. लैंगिक शोषणाच्या विरोधातील आंदोलनादरम्यान जेव्हा आम्हाला रस्त्यावर फरपटत नेलं जात होतं, तेव्हा भाजप वगळता सर्व पक्ष आमच्या पाठिशी होते. त्यांना आमची व्यथा, आमचे अश्रू समजले. महिलांवरील अत्याचाराविरोधात लढण्यास सज्ज असलेल्या पक्षात प्रवेश केल्याचा अभिमान आहे. रस्त्यांपासून संसदेपर्यंत लढाई लढण्यास पक्ष तयार आहे, असं विनेश फोगाट म्हणाली.

भाजप महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठिशी

काँग्रेस पक्ष आणि देशाला मजबूत करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करू, असं बजरंग पुनिया यानं काँग्रेस प्रवेशानंतर सांगितलं. भाजप महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पुनिया यानं केला. महिला अत्याचाराविरोधात आम्ही जेव्हा लढत होतो, तेव्हा आम्ही राजकारण करत असल्याचा आरोप भाजपनं केला होता. पण त्यात काहीही तथ्य नव्हतं. आम्ही भाजपच्या सर्व महिला खासदारांना मदतीसाठी पत्र लिहिलं होतं, पण तरीही त्या आल्या नाहीत. महिलांसाठी लढल्याची किंमत आम्ही चुकवली. यापुढं आम्ही काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू, असं बजरंग पुनिया म्हणाला.

तेव्हा भाजपचा आयटी सेल जल्लोष करत होता!

‘ज्या दिवशी विनेश फोगाट फायनलसाठी पात्र ठरली, त्या दिवशी संपूर्ण देश आनंदी होता. मात्र, दुसऱ्या दिवशी काही तांत्रिक कारणामुळं जेव्हा तिला अपात्र ठरवण्यात आलं, तेव्हा सगळे दु:खी होते. त्यावेळी फक्त आयटी सेल जल्लोष करत होता,’ असा आरोप पुनिया यानं केला. बजरंग पुनिया यानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकलं आहे.

आंदोलनामुळं आले चर्चेत

गेल्या वर्षी भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या विरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यात बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचाही सहभाग होता. भाजपकडून त्यांच्यावर अनेक आरोप झाले. मात्र, ते मागे हटले नाहीत.

काँग्रेसला नैतिक बळ

हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडीच्या वाटाघाटी सुरू आहेत. त्यातच फोगाट आणि पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं काँग्रेसची ताकद वाढली आहे.

Whats_app_banner