मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Elections : देशातील असं गाव जिथं कधीच कोणी मतं मागण्यासाठी गेलं नाही, ग्रामस्थांनी पाहिलेच नाहीत आमदार-खासदार!

Elections : देशातील असं गाव जिथं कधीच कोणी मतं मागण्यासाठी गेलं नाही, ग्रामस्थांनी पाहिलेच नाहीत आमदार-खासदार!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 20, 2024 05:42 PM IST

Viral News : निवडणुकीच्या काळात उमेदवार मतदारांच्या भेटीला जात असतात. मात्र उत्तराखंड राज्यातील एक गाव याला अपवाद आहे.

ग्रामस्थांनी पाहिलेच नाहीत आमदार-खासदार!
ग्रामस्थांनी पाहिलेच नाहीत आमदार-खासदार!

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धूमधाम सुरू आहे. मात्र देशात असे एक गाव आहे जेथे कधीच कोणी मतं मागण्यासाठी गेलं नाही. विशेष म्हणजे अनेक वृद्ध व्यक्तींनीही खासदार किंवा आमदारांना पाहिले नाही. निवडणुकीच्या काळात उमेदवार मतदारांच्या भेटीला जात असतात. मात्र उत्तराखंड राज्यातील एक गाव याला अपवाद आहे.

हे गाव देहरादून जिल्ह्यातून चकराता परिसरातील उदांवा गाव आहे. देशात पहिली लोकसभा निवडणूक १९५२ मध्ये झाली होती. यानंतर आतापर्यंत जवळपास ७२  वर्षाच्या निवडणुकांच्या इतिहासात लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये एकही उमेदवार या गावात मते मागण्यासाठी आलेला नाही.

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी सक्रीय झाले आहेत. मतांसाठी उमेदवारांनी शहरांबरोबरच ग्रामीण भागाचे दौरेही सुरू केले आहेत. मात्र टिहरी लोकसभा मतदारसंघातील उदांवा गाव याला अपवाद ठरले आहे. 

सात दशकांहून अधिक काळ लोटला तरीही गावकऱ्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे दर्शन झालेले नाही. या गावात पोहोचण्यासाठी जवळपास १० किलोमीटर अंतराचे चढ चढावा लागतो. मात्र गावकरी आपल्या मतदाराचा हक्क न विसरता बजावतात.

उदांवा गावचे रहिवासी व माजी सरपंच बहादुर सिंह चौहान यांनी सांगितले की, त्यांच्या गावात निवडणुकीची लगबग काहीच दिसून येत नाही. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कोणत्याही पक्षाचा उमेदवार गावात मते मागण्यासाठी आलेला नाही.

मतदान करण्यासाठीही खूप अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र भीतीपोटी मतदान करावे लागते, जेणेकरून मतदान यादीतून नाव काढले जाऊ नये.  बुल्हाड ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या या गावात आजपर्यंत एकही उमेदवार मत मागण्यासाठी आलेला नाही. गावातील अनेक वृद्ध असे आहेत, त्यांनी खासदार, आमदाराचा चेहराच पाहिलेला नाही.

संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र उदांवा गावातील लोक आजही मूलभूत सोयींसाठी संघर्ष करत आहेत. गावात जर कोणी आजारी पडले तर झोळीतून त्याला १० किलोमीटर दूर रस्त्यापर्यंत पोहोचवावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण आपला जीव गमावतात. गावात सरकारी सुविधेच्या नावावर केवळ एक प्राथमिक विद्यालय सुरू आहे.

IPL_Entry_Point