Viral Video : मुसळधार पाऊस, गुडघाभर पाणी; तरीही झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जेवण!-video zomato agent braves knee deep water to deliver food in ahmedabad ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : मुसळधार पाऊस, गुडघाभर पाणी; तरीही झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जेवण!

Viral Video : मुसळधार पाऊस, गुडघाभर पाणी; तरीही झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जेवण!

Aug 31, 2024 06:54 PM IST

Zomato Agent Viral Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांना टॅग करून संबंधित व्यक्तीला बक्षीस देण्याची विनंती केली.

झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (X/@vikunj1)

Viral News: गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून नदी- नाल्यांना पूर आला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, गुजरातच्या अहमदाबादमध्ये रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे लोक घराबाहेर पडणे टाळत असताना झॉमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने गुडघ्याभर पाण्यातून चालत जाऊन आपल्या ग्राहकांपर्यंत जेवण पोहोचवले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी संबंधित व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत आहेत. 

ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो नंतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल झाला. हा व्हिडिओ अहमदाबाद येथील असून मुसळधार पावसात झॉमॅटोचा डिलिव्हरी बॉय ग्राहकांपर्यंत जेवण पोहोचवत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पुन्हा शेअर करत झॉमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांना टॅग करून संबंधित व्यक्तीला बक्षीस देण्याची विनंती केली.

या व्हिडिओला आतापर्यंत ३.२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या वाढतच चालली आहे. या व्हिडिओवर लोकांनी विविध कमेंट्स पोस्ट केल्या आहेत. काहींनी डिलिव्हरी एजंटच्या कामाचे कौतुक केले. तर. काहींनी पूरसदृश्य परिस्थितीत ऑनलाईन जेवण मागवणाऱ्या ग्राहकावर संताप व्यक्त केला.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

'या संकट काळात जेवणाची ऑर्डर देणारा तो हुशार माणूस कोण आहे? त्या व्यक्तीला शोधण्याची गरज आहे,' असे एका एक्स युजरने लिहिले आहे. आणखी एकाने म्हटले आहे की, ‘अशा परिस्थितीत सेवा बंद करण्याची गरज आहे.’ तिसऱ्याने लिहिले की, ‘झोमॅटोवर खटला दाखल करण्यात यावा. अशा नैसर्गिक आपत्तीत कंपनीने सेवा बंद करायला हव्यात.’  आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘जबाबदारी माणसाला खूप काही गोष्टी शिकवते, या भावाला सलाम! एका व्यक्तीने लिहिले की, ‘दीपिंदर गोयल, झोमॅटो, कृपया या व्यक्तीला बक्षीस द्या.’

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'आसन' चक्रीवादळामुळे गुजरातमध्येही मुसळधार पाऊस पडत असल्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे ३०० हून अधिक मगरींचे वास्तव्य असलेल्या विश्वामित्र नदीला ही पूर आल्याने त्या मानवी वसाहतीत आढळून येत आहेत. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेकांना आपल्या जीव गमवावा लागला आहे.

विभाग