Holi Viral Video: उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वराला थांबवून आणि त्याच्यामागे बसलेल्या दोन मुस्लीम महिलांना जबरदस्तीने रंग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बिजनौर पोलिसांनी कारवाई केली. व्हायरल व्हिडिओतील तीन तरुणांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. ही घटना शनिवारी घडली. पीडित महिला औषध घेण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला.
व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरुण मुस्लीम महिलांची मोटारसायकल थांबवून त्यांच्याशी वाद घालताना दिसत आहेत. सुरुवातील तरुणांनी दुचाकीस्वारला रंग लागला. त्यानंतर त्याच्या मागे बसलेल्या महिलांवर पाण्याने भरलेले बादली ओतली आणि त्यांना रंग लावत हर हर महादेव, जय श्रीराम आणि होळी है अशा घोषणा दिल्या.
होळी हा एक शुभ सण आहे. कुणालाही त्रास देऊ नका, जबरदस्तीने लोकांवर रंग लावू नका. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,' असे बिजनौरचे पोलिस नीरज जादौन यांनी व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात जारी केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करने या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना ही गुन्हेगारी शारीरिक अत्याचाराची घटना असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना संबंधित तरुणावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.