अॅटलस एअरच्या बोईंग ७४७- ८ मालवाहू विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील क्रूने सर्व मानक प्रक्रियेचे पालन केले आणि सुरक्षितपणे विमान विमानतळावर लँड केले, अशी माहिती अॅटलस एअरने एका निवेदनातून दिली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये उड्डाणादरम्यान विमानाच्या डाव्या विंगमधून आग निघत असल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बोईंग विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत. मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या एका व्यक्तीने आगीची घटना मोबाईच्या कॅमेऱ्यात कैद केली. हे विमानाने मियामी विमानतळावरून १०.३२ मिनिटांनी उड्डाण केले होते. मात्र, इंजिनमध्ये आग लागल्याने हे विमान लगेच ११ वाजताच्या सुमारास इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान बोईंग ७४७- ८ होते, जे चार जनरल इलेक्ट्रिक जीएनएक्स इंजिनद्वारे चालते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने मियामी-डेड फायर रेस्क्यूच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी विमानात किती कर्मचारी होते? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संबंधित बातम्या