jammu kashmir terrorist encounter viral video : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक दहशतवादी जीव वाचवण्यासाठी इमारतीतून पळत असल्याचं दिसत आहे. यावेळी लष्कराच्या जवानांनी गोळीबार करून त्याला यमसदनी धाडलं. लष्कराची ही मोहीम रात्रभर सुरू होती. लष्कराच्या या ऑपरेशनला मोठं यश मानलं जात आहे. बारामुल्लाच्या चक थापर किरीमध्ये ही कारवाई करण्यात आली. यात तीन कट्टर दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं याशिवाय येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. लष्कराच्या १० सेक्टर राष्ट्रीय रायफलचे ब्रिगेडियर संजय कानोथ यांनी ही माहिती दिली.
चकमकीच्या ड्रोन फुटेजमध्ये दहशतवादी ज्या घरात लपला होता त्या घरातून तो पळून जात असल्याचं दिसत आहे. घरातून बाहेर पळत येत तो घराच्या संरक्षण भिंतीच्या दिशेने पळतो. मार, याच वेळी जवानांनी केलेल्या गोळीबारात गोळी लागून तो खाली पडला. यानंतर जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तो सरपटून भिंतीकडे जाऊ लागतो व पुन्हा उठून पळण्याच्या प्रयत्नात असतांना लष्कराच्या जवानांनी त्याच्यावर पुन्हा गोळीबार केला. यात त्याच्या जागीच मृत्यू झाल्याचं दिसत आहे. या थराक गोळीबारात भिंतीलाही गोळ्या लागून तिचे नुकसान झाल्याचं व्हिडिओत दिसत आहे. यावेळी गोळीबारामुळे मातीचा धूर हवेत उडतांना दिसत आहे. हा सर्व थरार व्हिडिओत कैद झाला आहे. जम्मूमध्ये गेल्या काही काळापासून ज्या प्रकारे दहशतवादी सक्रिय आहेत, ते पाहता ही कारवाई सुरक्षा दलासाठी मोठे यश मानले जात आहे.
याशिवाय कुपवाडा येथे झालेल्या दुसऱ्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. ब्रिगेडियर कानोथ म्हणाले की, चक थापर वॉटरगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची ठोस माहिती आम्हाला मिळाली होती. यानंतर लष्कर तेथे पोहोचले. यानंतर घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात लष्करानेही गोळीबार केला. लष्कराच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई सकाळपर्यंत सुरू होती आणि यात सामान्य लोकांची कोणतीही जीवित किंवा वित्तहानी न होता दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये १८ सप्टेंबरपासून निवडणुकीला सुरुवात होत आहे, त्या पूर्वीच मोठा घात पात करण्याच्या प्रयत्नात दहशतवादी होते.