Israel–Hezbollah Conflict: इस्रायलच्या लष्कराने लेबनॉनमध्ये इराणसमर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने वापरलेले अनेक भुयारी बोगदे उद्ध्वस्त केल्याची माहिती 'आयडीएफ'ने रविवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत दिली आहे.
आयडीएफच्या व्हिडिओनुसार, स्मशानभूमीखालील बोगदा एक किलोमीटरपेक्षा जास्त लांब होता आणि रॉकेट सिस्टम, ग्रेनेड लाँचर आणि बंदुका अशा विविध प्रकारच्या शस्त्रांनी भरलेला होता. हा बोगदा बुजवण्यासाठी साडेचार हजार घनमीटर काँक्रीट बोगद्यात टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायली समुदायांवर हल्ला केल्यापासून इस्रायल आणि इराणसमर्थित हिजबुल्लाह यांच्यात लेबनॉनच्या युद्ध सुरू आहे.
आयडीएफने गेल्या महिन्यात लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह वापरत असलेले गुप्त बोगदे देखील शोधून काढले. जे लेबनीज नागरिकाच्या घराखाली बांधण्यात आले होते. गाझामध्ये हमासने बांधलेल्या बोगद्यांपेक्षा हे बोगदे खूपच वेगळे असल्याचे सांगण्यात आले. एका इस्रायली सैनिकाने दाखवलेल्या व्हिडिओमध्ये हा बोगदा १०० मीटर लांबीचा होता, ज्याला लोखंडी दरवाजे होते. तसेच या बोगद्यात एके-४७ रायफल, खोल्या, एक बेडरूम, एक बाथरूम, जनरेटरसाठी एक स्टोरेज रूम, पाण्याच्या टाक्या आणि दुचाकी होत्या.
दक्षिण लेबनॉनमधील गावांमध्ये हिजबुल्लाह काय करत आहे हे पाहण्यासाठी आम्ही सीमा ओलांडून दक्षिण लेबनॉनमध्ये प्रवेश करत आहोत. उत्तर इस्रायलवर ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांच्या घरांखाली लपून बसले आहे,' असे इस्रायली सैनिक क्लिपमध्ये सांगताना दिसत आहे.
इस्रायलच्या लष्कराने रविवारी गाझा आणि लेबनॉनमध्ये हवाई हल्ले केले, ज्यात असंख्य लोक ठार झाले. युद्धग्रस्त गाझा पट्टीच्या उत्तर भागात इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेल्या तीस जणांमध्ये १३ लहान मुलांचाही समावेश आहे. इस्रायलच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत ४३ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या हल्ल्यात ४१ जण ठार झाले असून राजधानी बैरूतच्या उत्तरेला झालेल्या हल्ल्यात २३ जण ठार झाले आहेत. लेबनॉनमध्ये सीमेपलीकडून संघर्ष सुरू झाल्यानंतर इस्रायलने २३ सप्टेंबररोजी इराणसमर्थित मिलिशियावर हल्ला चढविल्यानंतर आतापर्यंत ३,१०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.