Haryana Assembly Elections 2024 : हरयाणा विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी प्रमुख पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. त्यातून इच्छुकांची नाराजीही समोर येत आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळं धक्का बसलेले एक माजी आमदार अक्षरश: सर्वांसमोर रडले. हतबल झालेल्या या आमदाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हरयाणा विधानसभेसाठी भाजपनं उमेदवार यादी जाहीर केली आहे. माजी आमदार शशी रंजन परमार यांचं नाव यादीत नाही. याबाबत एका वृत्तवाहिनीवर त्यांना विचारण्यात आलं. त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा गळा भरून आला आणि ते अक्षरश: हमसून हमसून रडायला लागले.
परमार यांनी हरयाणातील भिवानी आणि तोशाम मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी दावा केला होता. मला तिकीट मिळेल. माझ्या नावाचा विचार सुरू आहे, असं मी लोकांना सांगितलं होतं. आता मी काय करू? मला खूप असहाय वाटतंय. माझ्यासोबत असं का होतंय? ही कोणत्या प्रकारची वागणूक आहे? मला खूप दु:ख झालंय, असं परमार म्हणाले.
परमार यांची ही अवस्था पाहून मुलाखतकारानं त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 'पक्ष तुमच्या गुणवत्तेकडं लक्ष देईल आणि कदाचित दुसऱ्या एखाद्या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, असं मुलाखतकार सांगत होता. मात्र, परमार यांना रडू आवरत नव्हतं.
हरयाणात ५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपनं ६७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर पक्षात बंडखोरीची लाट उसळली आहे. माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे चिरंजीव मंत्री रणजितसिंह चौटाला आणि आमदार लक्ष्मण दास नपा यांनी तिकीट न मिळाल्यानं पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. समर्थकांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतल्याचं चौटाला यांनी सांगितलं. आता ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
हरयाणा विधानसभेसाठी काँग्रेसनं ६६ उमेदवारांची यादी तयार केली आहे. मात्र, अद्याप घोषणा केलेली नाही. काँग्रेसची आम आदमी पक्षासोबत आघाडीची चर्चा सुरू असल्यानं ही घोषणा लांबल्याचं बोललं जातं. आम आदमी पक्षाशी आघाडी करण्यास आणि आघाडी केलीच तर जास्त जागा देण्यास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळं ही आघाडी होते का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे सगळं घडत असतानाच प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.