Sitaram Yechury : माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sitaram Yechury : माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sitaram Yechury : माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Published Sep 12, 2024 04:13 PM IST

Sitaram Yechury passes away : माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सीताराम येचुरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन
सीताराम येचुरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन (PTI)

माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना न्यूमोनिया झाला होता व नवी दिल्लीत एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ७२ वर्षांचे होेते.

सीताराम येचुरी यांना १९ ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेव्हापासून ते लाइफ सपोर्ट सिस्टिमवर होते. अलीकडे त्यांच्या तब्येतीत किंचित सुधारणा झाली होती,पण नंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानेपरिस्थिती गंभीर झाली होती. त्यांना न्यूमोनिया झाला होता.

पाच दशके डाव्या राजकारणाचा केंद्रबिंदू

त्यांच्या पश्चात पत्नी सीमा चिश्ती येचुरी, मुलगी अखिला असा परिवार आहे. सीताराम येचुरी यांनी विद्यार्थी जीवनापासून राजकारणाला सुरुवात केली आणि ते जेएनयू विद्यार्थी संघटनेचे सदस्य होते. आणीबाणीच्या काळात तुरुंगात राहून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सुमारे पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत ते डाव्या पक्षांचे केंद्रबिंदू होते. डाव्या पक्षांना युतीच्या राजकारणात आणण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. यूपीए १ आणि यूपीए-२ च्या काळात त्यांनी डाव्या पक्षांना सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी राजी केले.

एप्रिल २०१५ मध्ये त्यांची सीपीएमच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय २०१६ मध्ये त्यांना राज्यसभेतील सर्वोत्कृष्ट  संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सीताराम येचुरी आयुष्यभर धर्मनिरपेक्षता, आर्थिक समता यांसारख्या मूल्यांसाठी कटिबद्ध होते.

तेलुगु ब्राम्हण कुटूंबात जन्म -

सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी मद्रास येथे झाला. ते तेलुगू ब्राह्मण कुटुंबातील होते. त्यांचे वडील आंध्र प्रदेश रोडवेजमध्ये इंजिनिअर होते आणि आईही सरकारी अधिकारी होती. ते हैदराबादमध्ये वाढले आणि दहावीपर्यंत हैदराबादच्या ऑल सेंट्स हायस्कूलमध्ये शिकले. यानंतर ते दिल्लीला गेले आणि त्यांनी डीयूए आणि जेएनयूमधून उच्च शिक्षण घेतले. येचुरी यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात बीए (ऑनर्स) पदवी घेतली आणि त्यानंतर जेएनयूमधून अर्थशास्त्रात एमए केले. अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी.ही करायची होती, पण नंतर आणीबाणीच्या काळात ते चळवळीचा भाग बनले. त्याला अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. इथून ते अभ्यासापासून दूर गेले आणि राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले. सीताराम येचुरी यांचे काँग्रेस, राजदसह अनेक पक्षांशी चांगले संबंध होते. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला.

विद्यार्थी दशेपासून माकपच्या विचारांशी जुळली नाळ -

सीताराम येचुरी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) शिक्षण घेत असताना विद्यार्थी चळवळीत सहभागी झाले. येचुरी यांची राजकीय विचारधारा येथेच रुजली. विद्यार्थी दशेतच त्यांनी मार्क्सवादी तत्त्वांचा स्वीकार केला आणि माकपची विद्यार्थी शाखा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) सदस्य बनले.

२०१५ मध्ये येचुरी यांची माकपच्या सरचिटणीसपदी प्रकाश करात यांच्या जागी निवड झाली होती. विशेषत: २०११  मध्ये पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर घसरत माकपसाठी सरचिटणीस पदाचा त्यांचा कार्यकाळ आव्हानात्मक होता. येचुरी यांनी इतर डाव्या आणि धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत व्यापक आघाडीची बाजू मांडून या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न केला, या भूमिकेमुळे कधीकधी पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाले.

येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष २०२१ मध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडल्यानंतर त्यांच्यावर मोठा आघात झाला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर