Train stuck in Traffic in Varanasi : रेल्वे गाडी अडकून पडत असेल तर ! विश्वास बसत नाही ना. पण हे खरे आहे. वाराणसीच्या वाहतूककोंडीत एक रेल्वे अडकून पडली होती. या रेल्वेला मार्ग देतांना वाहतूक पोलिसांचाही घाम निघाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
यूपीच्या वाराणसीमध्ये ही घटना पाहायला मिळाली. वाराणसी येथे एक ट्रेन ही ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली होती. रस्त्यावरील वाहनांच्या मध्ये रेल्वे ट्रॅफिकमध्ये अशा प्रकारे अडकली की पोलीस कर्मचाऱ्यांनाही या गाडीची कोंडीतून सुटका करतांना घाम फुटला. कोंडीत ट्रेन अडकल्याने गाडीचा लोको पायलटही अस्वस्थ होऊन मार्ग मोकळा होण्यासाठी त्याने रेल्वेचा हॉर्न वाजवतच ठेवला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. काहींनी याला गंमत म्हटले, तर काहींनी वाढत्या वाहतुकीवर चिंता व्यक्त केली.
हा व्हिडिओ ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडलेल्या वाहनाच्या आतून बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये ट्रेनच्या आजूबाजूला वाहने, बाइक्स आणि ऑटो देखील अडकून पडले आहेत. रेल्वे ट्रॅकच्या एका बाजूला ट्रेन उभी आहे. तर गाडीच्या पुढून एका बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत वाहने अडकून पडली आहेत. यामुळे रेल्वे ही एकाच जागेवर थांबून आहे.
येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ट्रॅफिक पोलीस प्रयत्न करतांना या व्हिडिओत दिसत आहे. मात्र, त्यांना न जुमानता लोक ट्रेनसमोरूनच आपली वाहने पुढे दामटत आहेत. यामुळे नाईलाजाने ट्रेनचा लोको पायलट देखील हॉर्न वाजवत आहे, जेणेकरून लोक ट्रेनच्या पुढे थांबणार नाहीत. परंतु कोंडीमुळे अनेक वाहने ही ट्रेनच्या पुढे अडकून पडली आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लोकांनी सांगितले की, हे फक्त भारतातच होऊ शकते. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले की एक ट्रेन देखील ट्रॅफिकमध्ये अडकू शकते.
हा व्हिडिओ या महिन्याच्या सुरुवातीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ बनारस स्टेशनजवळचा आहे. ही ट्रेन तिथून जाणाऱ्या FC I लाईनवर धावली. या लाईनचा वापर कमी असल्याने येथे गेट नसल्याने येथे वाहतूक कोंडी ही नेहमीच होते.
संबंधित बातम्या