वाराणसीतील भेलूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भदैनी भागात ही खळबळजनक घटना घडली आहे. येथे पती-पत्नी आणि त्यांची तीन मुले, दोन मुले आणि एक मुलगी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी पतीने पत्नी आणि तीन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते. परंतु प्राथमिक तपासात या पाच जणांना कोणीतरी ठार मारल्याचे निष्पन्न झाले आहे. भदैनी येथील एका घरात पत्नी व मुलांचा तर रोहनिया येथील बांधकाम सुरू असलेल्या घरात पतीचा मृतदेह आढळून आला. प्रत्येकावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंध आणि २७ वर्षांपूर्वी कुटुंबात झालेल्या दोन खुनांचा संबंध जोडून वाराणसी पोलिस आता तपास करत आहेत. चौकशीनंतर परिस्थिती स्पष्ट होईल, असे पोलिस आयुक्त मोहित अग्रवाल यांनी सांगितले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भदैनी येथील पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्याच्या पलीकडे असलेल्या चार मजली घरात आई शारदा देवी , राजेंद्र गुप्ता (५६), पत्नी नीतू (४५), मुले नवेंद्र (२४), सुवेंद्र (१५) आणि मुलगी गौरांगी (१७) रहात होते. राजेंद्र यांनी घराच्या तीन मजल्यावर स्वत:साठी फ्लॅट ठेवला होता. तर उर्वरित इतर खोल्या आणि फ्लॅटमध्ये भाडेकरू आहेत. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास मोलकरणीने पहिल्या मजल्यावरील नीतू यांची खोली उघडली असता तिचा मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
दुसऱ्या मजल्यावर धावत गेल्यावर तिला नवेंद्र आणि गौरांगी यांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या बेडरूममध्ये पडलेले दिसले. सुवेंद्रचा मृतदेह बाथरूममध्ये होता. हे पाहून तिने आरडाओरडा केला व भोवळ येऊन खाली पडली. आवाज ऐकून भाडेकरूही तेथे पोहोचले आणि समोरील दृष्य पाहून त्यांना धक्का बसला. या घटनेची माहिती भेलूपूर पोलीस व अधिकारी यांना दिली. राजेंद्र गुप्ता यांची हत्या झाल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांचा शोध घेण्यात आला.
दुपारी दोन वाजता राजेंद्रच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे मीरापूर रामपूर (रोहनिया) येथील बांधकाम सुरू असलेल्या घरात पोलीस पोहोचले असता खाटेवरील मच्छरदाणीत रक्ताने माखलेला त्याचा मृतदेह आढळून आला. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर राजेंद्रने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
एक गोळी त्याच्या डोक्यात तर दुसरी छातीत लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शरीरावर फक्त बनियान होते. घटनास्थळावरून एक टॉय गन सापडली. विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने कोणीतरी संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तळमजल्यावर राहणाऱ्या राजेंद्र यांची ७५ वर्षीय आई शारदा देवी या बचावल्या आहेत.