Vande Bharat Express Train: देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून देशातील अनेक शहरांदरम्यान वंदे भारत रेल्वे सुरू केली आहे. या वंदे भारत एक्स्प्रेसला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वंदे भारतनंतर अमृत भारत ट्रेनही प्रवाशांच्या सेवेत आली आहे. आता लवकरच स्लीपर वंदे भारत ट्रेनही प्रवाशांच्या सेवेत येत आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेच्या मिशन रफ्तार योजनेचे कामही प्रगतीपथावर आहे.
मिशन रफ्तारमुळे वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग वाढणार असून या ट्रेन तब्बल १६० किमी प्रतितास वेगाने धावणार आहेत. यामुळे या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास ५० मिनिटे वेळ वाचणार आहे.
येत्या दोन महिन्यात पश्चिम रेल्वे मार्गावरील मिशन रफ्तार प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मुंबई – सुरत – वडोदरा – दिल्ली त्याचबरोबर मुंबई–वडोदरा–अहमदाबाद या महत्त्वाच्या मार्गांवर रेल्वेचा ताशी वेश १६० किमी प्रतितास असणार आहे. त्यामुळे लवकरच पश्चिम रेल्वेवरील पहिली मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस ताशी १६० किमी वेगाने धावण्यास सज्ज होणार आहे. यामुळे मुंबई ते अहमदाबाद या मार्गावरील प्रवासाचा वेळ कमीत कमी ३० ते ५० मिनिटांनी कमी करण्याचा होऊ शकतो. तसेच मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर आणखी एक वंदे भारत सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे.
मिशन रफ्तारसाठी अंदाजे ३,९५९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेमुळे वंदे भारत, तेजस आणि शताब्दी एक्स्प्रेससारख्या रेल्वेगाड्यांचा प्रवास वेगवान होईल. पश्चिम रेल्वेच्या रुळाच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत उभारणे किंवा लोखंडी तारा लावणे सुरू आहे. यामुळे रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटना, गुरे रेल्वे मार्गावर येण्याच्या घटना रोखता येतील.