देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारतच्या यशानंतर रेल्वे लवकरच वंदे इंडिया स्लीपर आणण्याच्या तयारीत आहे. उत्कृष्ट आणि आधुनिक सुविधांमुळे वंदे भारत गाड्या नेहमीच प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. मध्यम अंतरासाठी ही ट्रेन उत्तम मानली जाते, आता लांब पल्ल्याच्या वंदे भारत स्लीपर आणण्याच्या योजनेवर रेल्वेकडून काम सुरू आहे. नुकताच नव्याने सुरू करण्यात आलेल्या वंदे इंडिया स्लीपर ट्रेनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर लोकांची या ट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा अनावर झाली आहे.
वंदे भारतच्या स्लीपर कोचचे इंटिरिअर पाहण्यासाठी लोक उत्सूक होते, आणि त्यांची उत्सुकता शांत करण्यासाठी एका युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर स्लीपर कोचचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी स्लीपर कोचचं कौतुक करत त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांत आपल्या डब्यांचे आधुनिकीकरण केले आहे, परंतु वंदे भारतचे स्लीपर कोच स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रवाशांची असेल. इतर वापरकर्त्यांनीही प्रवाशांनी डब्याची स्वच्छता आणि गुणवत्ता राखली पाहिजे यावर भर दिला आहे.
व्हिडिओची सुरुवातीला ट्रेनच्या बाहेरील भाग दाखवला आहे. त्यानंतर ड्रायव्हरची केबिन, वॉशरूम आणि एन्ट्री एरियाचा दौरा केला जातो. त्यानंतर कॅमेरा स्लीपर कोचच्या दिशेने जातो, जिथे एसी-३ कोचचा पहिला सीन दाखवला जातो जो एकदम नवीन आणि चमकदार दिसतो. यानंतर एसी-२ डब्याचा एक सीन पाहायला मिळाला, ज्यात आसन व्यवस्थेने अनेकांना प्रभावित केले.
हे नवीन स्लीपर कोच सुरू झाल्याने वंदे भारत गाड्या अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहेत. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासाला आणखी आरामदायक होणार आहे. भारतीय रेल्वेच्या या नव्या एक्सप्रेसमुळे प्रवाशांमध्ये उत्साह असून त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वंदे इंडिया स्लीपर सुरू करण्यासंदर्भात रेल्वेकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या