Vande Bharat Train - भारतीय रेल्वे पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांना मोठी भेट देणार आहे. पहिली वंदे भारत ट्रेन राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान धावणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून लोकांना काश्मीरमध्ये प्रवास करून सुंदर दऱ्या-खोऱ्याचा आनंद लुटता येणार आहे. जानेवारी २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी या वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवतील. काश्मीरमध्ये धावणारी वंदे भारत देशात सध्या धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांपेक्षा अधिक वैशिष्ट्यसंपन्न असेल.
'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली ते श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतमध्ये विशेष हीटिंग फीचर्स असतील. ज्या भागात तापमान शून्य अंशापर्यंत खाली येते, अशा भागांसाठी ही गाडी खास डिझाइन करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात हिवाळ्यात जोरदार बर्फवृष्टी होते आणि खोऱ्याचे दृश्य पाहण्यासारखे असते. यावेळी वंदे भारतचा प्रवास प्रवाशांसाठी नेत्रसुखद अनुभव असणार आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, 'काश्मीरच्या प्रवासासाठी चेअर कार व्हेरिएंट वंदे भारत ट्रेनच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. प्लंबिंग आणि पाण्याच्या टाक्यांसाठी विशेष हीटिंग व्यवस्था, ड्रायव्हरच्या फ्रंट लुकआऊट ग्लाससाठी एम्बेडेड हीटिंग एलिमेंट्स आणि अनेक आधुनिक सेफ्टी फीचर्स असतील.
ड्रायव्हर कॅबच्या पुढील बाजूस असलेल्या लुकआऊट ग्लासमध्ये एम्बेडेड हीटिंग एलिमेंट देण्यात आले आहे. हे घटक शून्यापेक्षा कमी तापमानात काच डीफ्रॉस्ट ठेवतील.
या विशेष वंदे भारत ट्रेनमधील पाण्याच्या टाक्यांमध्ये सिलिकॉन हीटिंग पॅड बसविण्यात आले आहेत, जेणेकरून ट्रेन काश्मीरमध्ये असताना पाणी गोठणार नाही. गाड्यांच्या पाणी वितरण व्यवस्थेत हीटिंग केबल आणि थर्मल इन्सुलेशनचा समावेश आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गामुळे काश्मीरला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.