Uttarakhand Man Kills Minor Cousin: उत्तराखंडच्या हरिद्वार येथून सगळ्यांना हादरून टाकणारी माहिती समोर आली. एका महिलेचे पुतण्याशी असलेल्या प्रेमसंबंधाबाबत तिच्या मुलाला कळाले. त्यानंतर मुलाने महिलेला प्रियकर पुतण्यासह नववर्ष साजरे करण्यापासून रोखले. मात्र, यामुळे राग अनावर झाल्याने पुतण्याने महिलेच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी आरोपी पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. अमित कटारिया असे आरोपीचे नाव आहे.
हरिद्वार पोलिसांनी यश उर्फ क्रिश हत्या प्रकरणाचा पर्दाफाश केला. अमित कटारिया यशच्या आईसोबत अनैतिक संबंध होते, असा पोलिसांचा दावा आहे. अवैध संबंध आणि १.२५ कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या लालसेपोटी ही हत्या करण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधीक्षक परमेंद्र डोबल यांनी बुधवारी एसपी सिटी कार्यालयात पत्रकार परिषदेत या घटनेचा खुलासा केला. एसएसपीच्या म्हणण्यानुसार, कानखलच्या रविदास बस्ती येथे राहणारा यश हा ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाच्या पार्टीसाठी घरून निघाला होता, पण तो घरी परत आला नाही. त्यानंतर १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी त्याचा मृतदेह बैरागी कॅम्प परिसरातील गंगेच्या काठावर आढळून आला. डोक्यावर जखमेच्या खुणा आढळल्या. यशच्या आईने अमित कटारियाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
यशची आई हरिद्वार महापालिकेत कर्मचारी आहे. पतीच्या निधनानंतर महिलेला महापालिकेत नोकरी लागली. शेजारी राहणाऱ्या अमित कटारियासोबत तिचे अवैध संबंध असल्याचे तपासात उघड झाले. दोघांत चुलती आणि पुतण्याचे नाते होते. यशला या दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत समजले. त्याने दोघांना भेटण्यास मनाई केली. यानंतर अमित यशच्या हत्येचा कट रचला.
दरम्यान, ३१ डिसेंबरच्या रात्री अमित यशला सोबत घेऊन गेला, तिथे अमित आणि यश यांच्यासह चौघांनी दारू प्यायली. सायंकाळी सातच्या सुमारास अमितने दोन जणांना घरी पाठवले. यशला खरेदीसाठी ज्वालापूरला नेले. त्यानंतर यशला बैरागी येथे नेऊन पुन्हा दारू पाजली. यश दारूच्या नशेत असताना त्याने आधी दोरीने त्याचा गळा आवळला आणि नंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. तसेच यशचा मृतदेह बैरागीजवळील नदीकडे टाकला.