लोकसभा निवडणुकीत रामजन्मभूमी अयोध्या इथं झालेल्या भाजपच्या पराभवाची देशभर चर्चा असतानाच आता हिंदूंचं एक पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या बद्रीनाथमध्येही भाजपचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवानंतर काँग्रेसनं संधी साधत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपचं द्वेषाचं राजकारण खुद्द देवालाही पसंत नसल्याचं यातून सिद्ध झालं आहे, असा टोला काँग्रेसनं सोशल मीडियातून हाणला आहे.
देशातील ७ राज्यांतील १३ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत आज इंडिया आघाडीनं जोरदार यश मिळवलं. भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या. यापैकी सर्वाधिक चर्चा भाजपच्या बद्रीनाथ इथल्या पराभवाची आहे. बद्रीनाथ हे चार धाम पैकी एक तीर्थक्षेत्र आहे. हिंदू धर्मीय मोठ्या आस्थेनं या ठिकाणाला भेट देत असतात. इथं काही पौराणिक ठिकाणांची विकासकामंही जोरात होती. तरीही पराभव झाल्यामुळं भाजपला मोठा धक्का बसला आहे.
बद्रीनाथमध्ये २००२ च्या निवडणुकीत राजेंद्र भंडारी हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं त्यांनाच बद्रीनाथ मतदारसंघातून उमेदवारी दिली, पण राजेंद्र भंडारी लोकांचा विश्वास जिंकू शकले नाहीत. भंडारी यांच्या ऐवजी मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार लखपत बुटोला यांच्यावर विश्वास दाखवला.
बद्रीनाथमध्ये सुरू असलेल्या मनमानी विकासकामांवर स्थानिक जनता, पुजारी व यात्रेकरूही नाराज होते. हीच नाराजी भाजपला महाग पडल्याचं मानलं जात आहे. इथं होत असलेल्या बांधकामांमुळं प्रल्हाद धारा आणि नारायण धाराचे रूप पालटल्याचं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. परंपरेनं रावलजींचा पट्टाभिषेक याच प्रवाहातून केला जातो, असं स्थानिक लोक सांगतात. याशिवाय, घरे आणि जागेसाठी पुरेसा मोबदला मिळत नसल्याबद्दलही लोकांमध्ये नाराजी आहे. या सर्व गोष्टी निवडणुकीत भाजपच्या विरोधात गेल्याचं निकालावरून दिसून आलं आहे.
बद्रीनाथमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस अधिकच आक्रमक झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देव भाजप आणि मोदीवर नाराज आहेत. त्याचं द्वेषाचं राजकारण, त्यांचा अहंकार, लोकांना बरबाद करणारी धोरणं देवालाही मान्य नाही हेच यातून दिसून आलं आहे, असं काँग्रेसनं एका व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटलं आहे.
भाजपची पुढची कसोटी केदारनाथमध्ये लागणार आहे. इथल्या भाजपच्या आमदार शैला राणी यांचं नुकतंच निधन झालं. लवकरच तिथंही पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. केदारनाथमध्येही लोकांमध्ये नाराजी कमी नाही. अलीकडेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिल्लीतील बुरारी इथं केदारनाथ धामच्या प्रतिकात्मक मंदिराचं भूमिपूजन केलं. त्यामुळं उत्तराखंडमधील संतांसह स्थानिक लोकांमध्ये नाराजी आहे. केदार घाटीतील नागरिकांमध्येही संताप आहे. चार धामांच्या दर्शनाचं आयोजन दिल्लीत होणार का?, असा सवाल तीर्थस्थळाचे पुजारी करत आहेत. हा सनातन धर्माचा व संस्कृतीचा अपमान असल्याचं पुजाऱ्यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या