देशात सर्वाधिक ८० खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यात भाजपप्रणित एनडीए आघाडीला मोठा झटका बसला असून येथे समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसच्या इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी ठिकठिकाणी मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. यूपीत सपाचे उमेदवार ३६ जागांवर तर भाजपचे उमेदवार ३३ जागांवर आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात एनडीए एकूण ३६ जागांवर तर इंडिया आघाडी एकूण ४१ जागांवर पुढे आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला २६ जागांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात एनडीएचे अनेक मंत्री सुद्धा पिछाडीवर असून यात अमेठीतून लढणाऱ्या भाजप उमेदवार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मिर्झापूरमधून अनुप्रिया पटेल यांचा समावेश आहे. २०१९ साली अमेठीत स्मृती इराणी यांनी तत्कालिन कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा ५५,१२० मतांनी पराभव केला होता. अमेठीतून कॉंग्रेसचे केएल शर्मा सध्या आघाडीवर आहेत. दरम्यान, देवभूमी अयोध्या शहराचा समावेश असलेल्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार पिछाडीवर आहे. कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या रायबरेली मतदारसंघात राहुल गांधी तर अमेठीतून कॉंग्रेसचे के एल शर्मा आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तरप्रदेशाती रायबरेली आणि अमेठी या दोन्ही मतदारसंघात कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी ठाण मांडून होत्या.
देशाचे लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार अजय राय यांनी पहिल्या फेरीत चांगली मुसंडी मारली होती. या फेरीत अजय राय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा पुढे गेले होते. नंतरच्या फेरीत नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेतली आहे.
उत्तर प्रदेशात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ८० पैकी ७२ खासदार निवडून आले होते. परंतु २०१९ साली ही संख्या कमी होऊन ६२ झाली होती. आता २०२४ मध्ये समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसने आघाडी करून एनडीएला जोरदार टक्कर दिली. उत्तर प्रदेशात २०१७ पासून भाजपची सत्ता आहे. परंतु राज्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न वाढतो आहे. त्यामुळे मतदार नाराज होते, असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. शिवाय गेल्या दहा वर्षाच्या सत्ताविरोधी लाटेचा फटका भाजपच्या खासदारांना बसला असल्याचे बोलले जात आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी आक्रमक प्रचार केला होता. लोकांचे प्रश्न हातात घेऊन राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपसमोर आव्हान उभे करण्यात त्यांना यश आले होते.
भाजपला दुसरा मोठा फटका हा पश्चिम बंगालमध्ये बसताना दिसत आहे. येथे तृणमूल कॉंग्रेस ३१ जागांवर आघाडीवर असून भाजप १० जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे १८ खासदार निवडून आले होते. येथे भाजपला ८ जागांचं नुकसान होताना दिसत आहे.
संबंधित बातम्या