Uttar Pradesh Docter News: उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका डॉक्टरचे कृत्य पाहून रुग्ण आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. संबंधित रुग्णाच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती, पण डॉक्टराने रुग्णाच्या उजव्या पायाची शस्त्रक्रिया केली. रुग्णांच्या नातेवाईकांनी दवाखाना डोक्यावर घेतल्यानंतर डॉक्टराने पळ काढला. या घटनेने एकच खळबळ माजली.
हे प्रकरण उत्तर प्रदेश येथील सुलतानपूरमधील आहे. एका ऑर्थोपेडिक सर्जनने वृद्ध रुग्णाच्या तुटलेल्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी दुसऱ्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचा आरोप आहे. ऑपरेशन रूममधून वृद्ध महिला बाहेर आल्यानंतर तिच्या तुटलेल्या पायाऐवजी दुसऱ्याच पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. ही बाब समोर आल्यानंतर आता रुग्णालय प्रशासन वेगळेच स्पष्टीकरण देत आहे.
प्रतापगड जिल्ह्यातील कन्हाई पोलीस स्टेशन हद्दीतील सिक्री कानुपूर गावातील रहिवासी भुईला देवी यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना चालताना त्रास होत होता. नातेवाईकांनी त्यांना डॉक्टरांकडे नेले आणि एक्स-रे केला असता त्याच्या डाव्या पायात फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. यानंतर डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. यानंतर महिलेला सुलतानपूरच्या कोतवाली शहरातील सुलतानपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती.
डाव्या पायाच्या शस्त्रक्रियेसाठी या महिलेला ऑपरेशन रूममध्ये नेण्यात आले. मात्र, शस्त्रक्रियेनंतर महिला ऑपरेशन रूममधून बाहेर आली, तेव्हा तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. या महिलेच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले असताना तिच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली, असा आरोपी तिच्या कुटुंबाने केला. त्यानंतर भुईला पुन्हा ऑपरेशन रूममध्ये नेण्यात आले, जेथे त्याच्या डाव्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले.
पीके पांडे असे चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आहे. या घटनेनंतर तो फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. आशुतोष श्रीवास्तव यांनी असे स्पष्टीकरण दिले की, महिलेच्या डाव्या पायाची वाटी सरकली होती म्हणून त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तर उजव्या पायाला सूज आली होती आणि रक्त साचले होते, त्यामुळे त्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली.
संबंधित बातम्या