UP School Teacher News: उत्तर प्रेदशच्या आग्रा येथून धक्कादायक बातमी समोर आली. सातचा पाढा बोलता न बोलणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शिक्षकाला अटक करण्यात आली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी त्याच्या अंगावर झालेल्या जखमांचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकला होता, जो काही क्षणातच प्रचंड व्हायरल झाला. हा फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांनी पालकांना शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद सिंह हे आपल्या कुटुंबासह पिनहटच्या मनसुखपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टोडा गावात राहतात. तर, त्यांचा आशिक सिंह (वय, ८) हा गावातील एका खासगी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत आहे.
प्रमोद सिंह यांनी आपल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, ‘आशिक हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी शाळेत गेला, जिथे शिक्षकाने त्याला सातचा पाढा बोलण्यास सांगितले. परंतु, आशिकला न जमल्याने शिक्षकाने त्याला काठीने बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. आशिक घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समजला. यानंतर पालकांनी शाळेत जाऊन शिक्षकाला जाब विचारला. त्यावेळी शिक्षकाने प्रमोद सिंह आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत धक्काबुक्की करत गैरवर्तन केले. यानंतर शाळेच्या व्यवस्थापकाने शिक्षकाला निलंबित केले.’ आशिकच्या कुटुंबातील नातेवाईकाने त्याला मारहाण केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि संपूर्ण प्रकार सांगितला. त्यावेळी अनेकांनी शिक्षिकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, सोमवारी आशिकच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठून आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी शिक्षिकाविरोधात शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तरुंगात पाठवले. या प्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रभारी मनसुखपुरा सुदामा लाल यांनी सांगितले की, पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
आग्रा जिल्ह्यातील सीगाना गावातील एका पूर्व माध्यमिक शाळेत मुख्यधापिका आणि शिक्षिका यांच्यात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. भांडणाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. परंतु, शिक्षिकेला शाळेत येण्यासाठी उशीर झाल्याने दोघांमधील वाद पेटल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.