BJP Leader wife Absconded : उत्तर प्रदेशमधील भदोही येथून एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे भाजप नेत्याची ४५ वर्षीय पत्नी ३० वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यासोबत घरातून पळून गेली आहे. विशेष म्हणजे तो पोलीस कर्मचारी असून महिलेपेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. महिलेचा पती भाजपचा नेता आहे. त्याने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेले २ मुले असून मोठी मुलगी २० वर्षांची तर ७ वर्षांचा एक मुलगाही आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महिलेने भदोहीमध्ये भाजपच्या तिकीटावर अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. आपल्याच घरी भाड्याने रहात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत पळून गेली. आरोप आहे की, महिलेने आपल्या ७ वर्षीय मुलालाही सोबत नेले आहे. पतीने आरोप लावला की, घरातून अडीच कोटीचे दागिने व पैसेही पत्नीने नेले आहेत.
महिलेच्या पतीने पोलिसांवर आरोप केला आहे की, त्यानेच पत्नीला फूस लावून पळवून नेले आहे. पतीने सांगितले की, माझी पत्नी ४५ वर्षाची असून पोलीस कर्मचारी ३० वर्षाचा आहे. दोघांत खूप वयाचे अंतर आहे. तो केवळ पैशांसाठी पत्नीसोबत पळून गेला आहे. त्यांनी शंका व्यक्त केली आहे की, तो पैशांसाठी पत्नीची हत्याही करू शकतो. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करत दोघांचा शोध सुरू केला आहे.
गोपीगंज नगर येथील भाजप नेत्याने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार एक वर्षापूर्वी गोंडा येथील पोलीस कर्मचारी विनय तिवारी उर्फ राज तिवारी त्यांच्या घरी भाड्याने रहायला आला. दरम्यान त्याने त्यांच्या पत्नीला आपल्या जाळ्यात ओढले. पत्नीचे काही आक्षेपार्ह फोटो काढून तो तिला ब्लॅकमेल करू लागला. त्याने पत्नीला सांगितले की, याची वाच्याता कोठे केल्यास सर्वांना अडकवून टाकेन. याची माहिती मिळताच आम्ही त्याला घरातून काढले व पत्नीलाही समजावून सांगितले.
पोलिसाला घरातून काढल्यानंतर तो षडयंत्र रचू लागला. याच षडयंत्रातून २८ ऑगस्ट रोजी त्याने पत्नीला आपल्या जाळ्यात अडकवून तिला आपल्यासोबत पळवून नेले. घरात कोणी नसल्याचे पाहून पत्नीने घरातून जवळपास २ कोटींचे दागिने आणि ४ लाखाची रोकड तसेच अन्य सामानही गाडीत टाकून नेले. त्यांनी त्यांच्यासोबत सात वर्षाच्या मुलालाही नेले आहे.