Parliament News: दिल्लीतील संसद भवनाजवळ बुधवारी (२५ डिसेंबर २०२४) एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या या व्यक्तीचा आज (२९ डिसेंबर २०२४) सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु, या व्यक्तीने नेमके कशामुळे आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामागचे कारण समोर आले आहे.
जितेंद्र असे मृत व्यक्तीचे नाव असून तो उत्तर प्रदेश येथील बागपत येथील रहिवासी आहे. जितेंद्रने बुधवारी दिल्लीतील संसद भवनाजवळ स्वत:ला पेटवून घेतले. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी आगीवर नियंत्रण मिळवून त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवाशी असलेला जितेंद्र हा बुधवारी दिल्लीत पोहोचला. पेट्रोलने भरलेली बॉटल सोबत घेऊन तो संसद भवनाजवळ पोहोचला. काही वेळ इकडे तिकडे भटकल्यानंतर त्याने पेट्रोल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतले. आग लागल्यानंतर तो रस्त्यावर धावू लागला. यावेळी यावेळी पादचाऱ्यांनी ब्लँकेट आणि अनेक कपड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवून त्याला ताबडतोब जवळच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले. या घटनेत जितेंद्र ९० टक्क्यांहून अधिक भाजला. त्यामुळे त्याचे वाचणे कठीण मानले जात होते. अखेर आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मयत जितेंद्रने संसद भवनाजवळ स्वत:ला पेटवून का घेतले, त्यामागचे कारण समोर आले आहे. जितेंद्र विरोधात बागपतमध्ये काही वादातून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजले. त्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागत होता. सततच्या त्रासाला वैतागून जितेंद्रने आत्महत्येचा निर्णय घेतला आणि दिल्लीला जाऊन संसद भवनाजवळ स्वत:ला पेटवून घेतल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या