Flipkart Delivery boy brutally Murder: वस्तूंची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याच्या जवळील दीड लाख रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन लुटले. त्यानंतर डिलिव्हरी बॉयचा मृतदेह पोत्यात भरून कालव्यात फेकला. याप्रकरणी पोलिसांनी एका जणाला अटक केले असून या घटनेतील मुख्य आरोपी मुंबईला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनौ येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार. भरतकुमार साहू (वय, ३२) असे हत्या करण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. भरत कुमार हा मूळचा अमेठीतील जामो संभाई गावात आपली पत्नीसोबत भाड्याने राहायचा. दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी सात्रिख रोडवरील फ्लिपकार्टच्या गोदामातून दोन मोबाइल घेऊन डिलिव्हरीसाठी निघाला होता. पेमेंट कॅश ऑन डिलिव्हरी होणार होते. मात्र, संध्याकाळी उशीर होऊनही भरतने पैसे जमा न केल्याने त्याच्या मॅनेजरने त्याला फोन केला. परंतु, त्याचा फोन बंद होता. यानंतर कंपनीच्या लोकांनी भरतच्या कुटुंबातील लोकांना याबाबत माहिती दिली. भरतचा भाऊ प्रेमकुमार याने त्याचा खूप शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी भरतच्या भावाने तो बेपत्ता असल्याचे स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी भरतच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली असता त्याने शेवटचा कॉल गजानन नावाच्या एका व्यक्तीला केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी गजानन याच्याशी संपर्क साधला असता त्याचा फोन बंद असल्याचे समजले. यानंतर पोलीस गजाननच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याची बहिण घरी होती. परंतु, तो कुठे आहे, याबाबत माहिती नसल्याचे त्याच्या कुटुंबातील लोकांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी गजाननच्या कॉल डिटेल्सची चौकशी केली असता त्याचे शेवटचे बोलणे आकाश झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी आकाशला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, गजानन आणि आकाश एकाच गाडीतून बाहेर पडल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी आकाशला खाक्या दाखवताच त्याने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. गजानन मुंबईला पळून गेल्याचे समजत आहे. पोलीसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे डिलिव्हरी करण्यासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले.