उत्तर प्रदेशातील हापुड मधील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने मंगळवारी मेरठमधील एका वैद्यकीय रुग्णालयात मुलीला जन्म दिला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आई आणि बाळ निरोगी आहेत. बलात्काराचा आरोपी आजोबा जुलैपासून तुरुंगात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बलात्कार पीडितेला जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मेरठ मेडिकल सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. बलात्कार पीडितेने रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला.
मेरठच्या डीएमच्या देखरेखीखाली बलात्कार पीडिता मुलीच्या आरोग्य आणि वैद्यकीय प्रसूतीचा खर्च उचलण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. सीएमओ डॉ. सुनील त्यागी यांनी सांगितले की, किशोरने मंगळवारी एका मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
दत्तक घेणाऱ्या संस्थेला दिले जाईल बाळ -
बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अभिषेक त्यागी यांनी सांगितले की, डीएम हापुड यांच्या निर्देशानुसार आणि नेतृत्वात बलात्कार पीडितेसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये मेरठ डीएम आणि मेडिकल कॉलेज मेरठला मुलीच्या आरोग्य आणि प्रसूतीसाठी आदेश जारी करण्यात आले होते. जन्मानंतर दत्तक एजन्सी काराला बाळ सोपवण्याचे आदेश दिले आहे.
पोटात दुखू लागल्यानंतर आजोबाचा कारनामा आला समोर -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पोटात दुखू लागल्यावर आजोबांनी तिला मुलीच्या काकांच्या घरी आणले आणि तिच्या पोटात दुखत असल्याचे सांगितले. मुलीला सोडून आजोबा परत गेला. मुलीची चुलती मुलीला घेऊन डॉक्टरांकडे पोहोचली तेव्हा ती गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. बालकल्याण समितीच्या पत्रानंतर डॉक्टरांच्या पॅनलने पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. ज्यामध्ये ती सात महिन्यांची गरोदर असल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगण्यात आले. डिलिव्हरीमध्येही अडचणी येऊ शकतात. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही खूप कमी होते.
मुलीची दु:खदायक कहाणी -
चित्रपटातील कथेप्रमाणेच पीडितेची कहाणी आहे. मेरठ जिल्ह्यातील एका गावात मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्या आईचा मृत्यू झाला. तिचे संगोपन वडील करत होते. मात्र २ वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचेही क्षयरोगाने निधन झाले. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर मुलीला वडिलांच्या काकाने आपल्याजवळ ठेऊन घेतले. मुलगी आजी-आजोबांसोबत बालपण घालवत होती. दरम्यान आजीचा मृत्यू झाला व आजोबाने तिचा लैंगिक छळ सुरू केला.