Uttar Pradesh Viral Video: रिल बनवण्याच्या नादात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत असूनही अनेकांचे धोकादायक ठिकाणी रील बनवणे सुरूच आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात रेल्वे रुळावर रील बनवणे एका दाम्पत्यासह त्यांच्या तीन वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतले. हे दाम्पत्य आपल्या मुलासह रेल्वे रुळावर रील बनवण्यात मग्न असताना एक्स्प्रेस गाडीने त्यांना उडवले. या घटनेने परिसरात खळबळ माजली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद आपल्या कुटुंबासह सीतापूरच्या शेख टोला येथील लहारपूर परिसरात राहत होता. त्यांना रील बनवण्याची सवय होती. हे जोडपे आपल्या मुलासह उमरिया कल्व्हर्टजवळील ऑईल रेल्वे क्रॉसिंगवर रील बनवत असताना एक्प्रेस गाडीने त्यांना धडक दिली. या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
छत्रपती संभाजीनगरात रील बनवण्याच्या नादात एका २३ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. श्वेता दिपक सुरवसे असे मृत तरुणीचे नाव आहे. श्वेता ही छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील सुलीभंजन दत्त मंदिराजवळ कारमध्ये बसून रील बनवत होती. कार चालवताना रिव्हर्स गिअर पडून अॅक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन खाली कोसळली. या घटनेत श्वेता हिचा जागीच मृत्यू झाला. तर कार दरीत कोसळल्यानंतर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सोशल मीडियावर कमी वेळा अधिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी रील हा एकमेव मार्ग आहे, असा बऱ्याच लोकांचा समज आहे. यामुळे तरुण- तरुणी हटके रील बनवण्याच्या नादात धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. अशा लोकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही अशा घटना थांबायचे नाव घेत नाहीत.