UP Accident : तेराव्याहून घरी परतताना मृत्यूनं गाठलं! भीषण अपघातात १५ जण जागीच ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता-uttar pradesh accident 15 dead in hathras road accident 11 injured ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UP Accident : तेराव्याहून घरी परतताना मृत्यूनं गाठलं! भीषण अपघातात १५ जण जागीच ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

UP Accident : तेराव्याहून घरी परतताना मृत्यूनं गाठलं! भीषण अपघातात १५ जण जागीच ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Sep 07, 2024 09:08 AM IST

Uttar Pradesh Hathras Accident: उत्तर प्रदेशातील हाथरसजवळ आग्रा-अलिगढ राष्ट्रीय महामार्गावर बस आणि व्हॅन यांच्यात भीषण अपघात झाला.

: उत्तर प्रदेशातील हाथरसजवळ आग्रा-अलिगढ राष्ट्रीय महामार्गावर बसची व्हॅनला धडक
: उत्तर प्रदेशातील हाथरसजवळ आग्रा-अलिगढ राष्ट्रीय महामार्गावर बसची व्हॅनला धडक

Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशातील हाथरसजवळ आग्रा-अलिगढ राष्ट्रीय महामार्गावर एका व्हॅनला बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात १५ जण ठार झाले. तर, अनेकजण जखमी झाले. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

व्हॅनमधील लोक शेजारच्या गावात एका व्यक्तीच्या तेराव्याला गेले होते. तेराव्याचा कार्यक्रम आटोपून घरी परतताना हाथरस जिल्ह्याच्या हद्दीतील मेटई गावाजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ११ जण जखमी झाले आहेत. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अलिगड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मृतांमध्ये ७ पुरूष, ४ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

पंतप्रधान मोदी शोकाकूळ

‘उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेला रस्ता अपघात अत्यंत वेदनादायी आहे. यात ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याप्रती माझी तीव्र संवेदना आहे. ईश्वर त्यांना या कठीण काळात शक्ती देवो. यासोबतच अपघातात जखमी झालेले लोक लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत करत आहे’, असे पीएमओच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आर्थिक मदतीची घोषणा

हाथरस दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईक आणि जखमींसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांनी पीएमएनआरएफमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील.’

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ट्विट

हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली असून जखमींवर योग्य उपचार करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. ‘हाथरस जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दु:खद आहे. मृतांच्या शोकाकूळ कुटुंबासोबत माझी संवेदना आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मी प्रभू श्रीरामांना प्रार्थना करतो की, दिवंगत आत्म्यांना त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि जखमींना लवकरात लवकर बरे करावे,’ असे मुख्यमंत्री योगी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Whats_app_banner
विभाग