पंजाबमधील रोपड़, फतेहगढ साहिब आणि होशियारपूर येथे गेल्या १४ महिन्यांत झालेल्या ११ खुनांचे गूढ मोबाइल फोन आणि केशरी गमछाने सोडवले. या प्रकरणी पोलिसांनी राम स्वरूप उर्फ सोढी याला अटक केली आहे. याची सुरुवात ऑगस्ट महिन्यात रोपड येथील रहिवासी मनिंदर सिंग यांच्या हत्येपासून झाली. मनिंदर बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या भावाने तपास सुरू केला असता एक संशयित मृतदेह झुडपात ओढत असल्याचे दिसले. पण अंधाराचा फायदा घेत तो पळून गेला. पोलिसांनी मनिंदरचा हरवलेला मोबाइल ट्रॅक करण्यास सुरुवात केली असता तो फोन जम्मूतील सांबा येथील एका दुकानदाराकडे सापडला. दुकानदाराने सांगितले की, त्याने हा फोन एका ढाब्यावर ५०० रुपयांना खरेदी केला होता.
पोलिसांना मनिंदरच्या शरीरावर केशरी रंगाचा गमछा सापडला होता. या गमछाच्या आधारे संशयिताची ओळख पटली. धाब्यावर चौकशी केली असता पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली. शोध आणि छापा टाकून पोलिसांनी भरतगड गावात राम स्वरूप ला अटक केली. चौकशीत त्याने ११ खून केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम स्वरूप याने ट्रकचालक, मजूर आणि ढाबा कर्मचाऱ्यांना शारीरिक संबंधांचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. पैसे देण्यास नकार दिल्यास तो त्यांना ठार मारायचा. आरोपींनी नऊ जणांची गळा दाबून हत्या केली आणि दोघांना बेदम मारहाण करुन मारले.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, राम स्वरूपने सांगितले की, त्याने ऑक्टोबर २०२३ मध्ये फतेहगड साहिब मध्ये ऑटो ड्रायव्हरची पहिली हत्या केली होती. त्याने मृतांपैकी एकाच्या पाठीवर 'चीटर' असेही लिहिले होते. पोलिसांनी आतापर्यंत ११ पैकी पाच मृतांची ओळख पटवली असून उर्वरितांचा तपास सुरू आहे.
राम स्वरूप हा दुबई आणि कतारमध्ये मजूर म्हणून काम करायचा. २०२२ मध्ये कुटुंबाने त्याला सोडून दिले, त्यानंतर तो भटकंतीचे जीवन जगू लागला. दोन दिवसांपेक्षा जास्त काळ तो एकाच ठिकाणी न थांबता चोरलेल्या फोनचे सिमही फेकून द्यायचा. पोलिसांनी आता मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या