israel iran war : अमेरिकेने इराणला इस्रायलचा बदला घेण्याचा विचार मनातून काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. पश्चिम आशियात सुरू असलेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने अमेरिकेने इराणला हा इशारा दिला आहे. इस्रायलने शनिवारी इराणच्या लष्करी तळांवर हल्ला केला. यात इराणच्या क्षेपणास्त्र निर्मिती कारखाने इस्रायलने नष्ट केले आहे. १ ऑक्टोबर रोजी इराणने इस्राइलवर सुमारे २०० पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागली होती. या हल्ल्याचा बदला म्हणूंन इस्रायलने १०० पेक्षा अधिक लढाऊ विमानांच्या मदतीने इराणच्या लष्करी तळावर हल्ला केला होता.
इस्रायलने इराणमधील अणूऊर्जा प्रकल्प आणि तेलसाठ्यांना लक्ष करण्यात आले नाही. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी इराणला इस्रायल प्रती हल्ला करू नका असा इशारा दिलेला. मात्र, या इशाऱ्याचा इराणवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. इराण या हल्ल्याचा सूड घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. इराण स्वत:च्या संरक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे इराणने स्पष्ट केलं आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात त्यांचे चार सैनिक मारले गेले आहेत. इराणच्या धमकीनंतर मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणावर युद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.
इराणच्या धमकीला इस्रायलने प्रत्युत्तर दिले. जर इराणने इस्रायलवर पुन्हा हल्ला केला तर याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे इस्रायलने स्पष्ट केलं आहे. यानंतर अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटननेही इराणला संघर्ष वाढवू नये, या साठी बजावले आहे. तर इराणने स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट करत सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटलं आहे.
हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमधील पाच रहिवासी भागांवर रॉकेट डागल्याचे म्हटले आहे. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, शनिवारी सीमेवर ८० क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायने ताब्यात घेतलेला भाग रिकामा करण्याचा इशारा दिला. दरम्यान, इस्रायली सैन्याने दक्षिण बैरूतमध्येही नागरिकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याची काही सॅटेलाईट छायाचित्रे समोर आली आहेत. या हल्ल्यादरम्यान इराणच्या तळांना लक्ष्य करण्यात आले होते. या ठिकाणी इराण क्षेपणास्त्र निर्मिती करत होता. दोन अमेरिकन संशोधकांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सिक्युरिटी रिसर्च ग्रुपचे प्रमुख आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी शस्त्र निरीक्षक डेव्हिड अल्ब्राइट आणि वॉशिंग्टनस्थित थिंक टँक सीएनएचे सहयोगी संशोधन विश्लेषक डेकर एव्हलेथ यांनी काही उपग्रहचित्र देखील पुढे आणले आहेत.
संबंधित बातम्या