अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे नसतील. बायडेन यांचा भारत दौरा रद्द झाल्याने दिल्लीत जानेवारीत होऊ घातलेल्या भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांदरम्यानच्या ‘क्वाड’ परिषदेच्या तारखांमध्येही बदल करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी सहा आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना आता सरकारला कार्यक्रमासाठी नवीन प्रमुख पाहुण्याचा नव्याने शोध घ्यावा लागणार आहे. दिल्लीत सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन समारंभात बायडेन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्याबद्दल भारत सरकारकडून कोणताही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. मात्र सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या जी २० परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांची द्विपक्षीय भेट झाली होती. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते, अशी माहिती अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी पत्रकारांना दिली होती. परंतु आता जानेवारीत बायडेन भारत दौऱ्यावर येणार नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आता 'क्वाड' परिषदेसाठी नवीन तारखांचा शोध सुरू असून आता २०२४च्या अखेरच्या महिन्यात ही परिषद घेण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा जानेवारीत प्रस्तावित भारत दौरा रद्द होण्यामागे इतर कारणांसोबतच अमेरिकेत २०२४ साली होऊ घातलेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक असल्याचे बोलले जात आहे. आपण राष्ट्राध्यक्षपदासाठी पुन्हा उभे राहणार असल्याचे बायडेन यांनी आधीच जाहीर केले आहे. दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून यासाठी संपूर्ण अमेरिकेत प्रचार मोहिमेवर निघणार असल्याचं कळतं.
जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस अमेरिकेत संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्राध्यक्षांना ‘अमेरिकेची सध्यस्थिती’ यावर वार्षिक संदेश द्यावा लागतो. त्याच्या तयारीसाठी बायडेन यांना वेळ हवा आहे. शिवाय मध्यपूर्वेत इस्त्रायल आणि हमासदरम्यान सुरू असलेले युद्ध हे सुद्धा बायडेन यांचा जानेवारीतला भारत दौरा रद्द होण्यामागे असल्याचे म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या