अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी अमेरिकेत कार्यरत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक गाडगीळ यांना अमेरिकेतला विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला आहे. वॉशिंग्टन येथील व्हाइट हाउस येथे झालेल्या कार्यक्रमात गाडगीळ यांचा गौरव करण्यात आला. आपल्या संशोधनाद्वारे जगभरातील नागरिकांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, महामारीशी मुकाबला करण्यामध्ये सक्षम करणे, अन्न सुरक्षा प्रदान करून लोकशाहीचे रक्षण करण्यामध्ये अमूल्य योगदान दिल्याबद्दल डॉ. अशोक गाडगीळ यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
‘डॉ. गाडगीळ यांनी लावलेल्या शोधांमुळं विज्ञान, तंत्रज्ञान तसेच नवकल्पना क्षेत्रात अमेरिका फार पुढे गेली आहे. गाडगीळ यांचे कार्य हे अमेरिकेच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे’, असं व्हाइट हाऊसने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
अशोक गाडगीळ हे मुळचे मुंबईकर आहेत. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९५० रोजी मुंबई शहरात झाला. डॉ. गाडगीळ यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले आहे. त्यांनी भौतिकशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर गाडगीळ यांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology - IIT) येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी डॉ. गाडगीळ यांनी अमेरिकेची वाट धरली. अमेरिकेतील बर्कले येथील प्रसिद्ध कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र विषयात एमएससी आणि पीएचडीचे शिक्षण घेतले आहे.
गाडगीळ सध्या अमेरिकेतील बर्कले शहरातील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेत ते वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात स्वच्छ पेयजल विषयाचे डिस्टिंग्विश प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. बर्कले येथील डेव्हलपमेंट इम्पॅक्ट लॅब आणि क्लीन एनर्जी रिसर्च सेंटर फॉर वॉटर एनर्जी टेक्नॉलॉजीचे फॅकल्टी डायरेक्टर म्हणूनही ते कार्यरत आहेत.
घरातील हवा आणि प्रदूषक प्रवाहांची संगणकीय द्रव गतिशीलता ओळखणे, इनडोअर रेडॉनच्या प्रवेशाचे आणि वाहतुकीचे सिम्युलेशन, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी त्यावर प्रक्रिया करण्याच्या विविध पद्धती या विषयामध्ये डॉ. गाडगीळ हे तज्ज्ञ मानले जातात. डॉ. गाडगीळ यांनी १५० पेक्षा कॉन्फ्रंसेसमध्ये संशोधन प्रबंध सादर केले असून अनेक पेटंट त्यांच्या नावावर आहेत.
संबंधित बातम्या