US Election 2024 : अमेरिकेत नव्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसाठी आज मंगळवारी (५ नोव्हेंबर) मतदान होणार आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपराष्ट्रपती कमला हॅरिस तर रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट लढत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ ते ९ या वेळेत मतदानाला सुरुवात होणार आहे. अमेरिकेतील बहुतांश मतदान केंद्रांवर ५ नोव्हेंबर रोजी पूर्वी (कोस्ट) प्रमाण वेळेनुसार (ईएसटी) सायंकाळी ७ ते ११ या वेळेत मतदान बंद होणार आहे.
फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या इलेक्शन लॅबनुसार, पोस्टल व्होटिंग सुविधेअंतर्गत यंदा ७ कोटी ८० लाखांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचाही समावेश आहे.
रविवारपर्यंतच्या शेवटच्या माहितीनुसार ७ कोटी ८० लाख ३ हजार २२२ नागरिकांनी अग्रिम मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ४२,६५५,३६४ मतदान हे व्यक्तिगत पातळीवर तर ३३,३४८,८५८ मतदान हे पोस्टाने झाले. निवडणूक अधिकाऱ्यांनी एकूण ६कोटी ७४ लाख ५६ हजार ८४७ पोस्टल बॅलेट मतदारांना मागणीच्या आधारावर पाठवले होते.
गेल्या निवडणुकीत एकूण १०.१ कोटींहून अधिक मतदारांनी पोस्टल मतदानाचा वापर करत आधीच मतदान केले होते. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. गेल्या वेळी कोविड-१९ महामारीमुळे लोकांनी पोस्टल मतदानाला प्राधान्य दिले होते. गेल्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मेल केलेल्या मतपत्रिकेत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यावेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना मतदान केंद्रांवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ५ नोव्हेंबरला होणार आहे, पण निकाल जाहीर होण्यास अनेक दिवस लागू शकतात. नवे राष्ट्रपती जानेवारी २०२५ मध्ये पदाची शपथ घेतील, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे देशातील दोन प्रमुख पक्ष पक्षांतर्गत प्रदीर्घ प्रक्रियेनंतर सर्वाधिक लोकप्रिय उमेदवाराची घोषणा करतात आणि सर्वात लोकप्रिय उमेदवाराची निवड करतात.
देशातील २५ राज्यांमध्ये इलेक्टोरल कॉलेजचे ५३८ सदस्य निवडून येतात. या इलेक्टोरल कॉलेजमधील किमान २७० किंवा त्याहून अधिक सदस्यांच्या पाठिंब्याने उमेदवार अध्यक्षपदी निवडला जातो. अध्यक्षपदाचा उमेदवार निवडण्याची प्रक्रिया निवडणुकीच्या वर्षाच्या जानेवारीत सुरू होते आणि ५ नोव्हेंबरला मतदान होतं. नवनिर्वाचित राष्ट्रपती २० जानेवारीरोजी शपथ घेणार आहेत.